धान्याच्या गोदामांवर आता ‘सीसीटीव्ही’ची नजर!
By Admin | Updated: November 23, 2014 00:24 IST2014-11-23T00:24:44+5:302014-11-23T00:24:44+5:30
अन्न व पुरवठा विभागाचा उपक्रम.

धान्याच्या गोदामांवर आता ‘सीसीटीव्ही’ची नजर!
नागेश घोपे
वाशिम: भ्रष्टाचाराच्या वाळवीने नखशिखांत पोखरलेल्या सार्वजनिक वितरण प्रणालीतील काळाबाजाराला लगाम लावण्यासाठी, स्वत धान्य दुकानांना धान्य वितरण करणार्या सर्व शासकीय गोदामांमध्ये आता क्लोज्ड सर्किट टेलिव्हिजन (सीसीटीव्ही) कॅमेरे बसविण्याचा निर्णय अन्न व पुरवठा विभागाने घेतला आहे. प्रारंभी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर ही योजना राबविण्यात येत असून, नंतर तिचा राज्यभर विस्तार करण्यात येणार आहे.
राज्यातील गरजू लाभार्थ्यांंना अन्न व पुरवठा विभागाच्या वतीने, सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत स्वस्त दरात अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येतो; मात्र सदर वितरण प्रणालीला भ्रष्टाचाराच्या वाळवीने पोखरले आहे. परिणामी, जनतेचा या प्रणालीवरील विश्वास उडाला आहे.
सार्वजनिक वितरण प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी, अन्न व पुरवठा विभागाने विविध उपाययोजना राबविण्याचा चंग बांधला आहे. पुरवठा विभागाची तालुक्याच्या ठिकाणी गोदामे आहेत. तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानांना त्या गोदामांमधून, धान्याचा पुरवठा करण्यात येतो. बहुतांश वेळा संबधित वितरकाने उचललेले धान्य लाभार्थ्यांपर्यंत न जाता, थेट काळाबाजारात पोहोचते. परिणामी शिधापत्रिकाधारक कुटुंबाना स्वस्त धान्याचा लाभ मिळत नाही. वितरण प्रणालीतील या काळाबाजाराला पायबंद घालण्यासाठी वितरणापासूनच स्वस्त धान्यावर नजर ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी गोदामांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय अन्न व पुरवठा विभागाने घेतला आहे. यामुळे सरकारी गोदामांमधील सर्व हालचाली कॅमेर्यात कैद होऊन, त्या तहसील कार्यालयातील संगणकासह अधिकार्यांच्या मोबाईलमध्ये दिसणार आहेत. सदर उपक्रमामुळे धान्याच्या उचलीची इत्यंभूत माहिती बसल्या जागी मिळणार आहे.