कॅशलेस व्यवहाराचा मालेगावात शेतक-यांना बसतोय फटका
By Admin | Updated: December 29, 2016 15:40 IST2016-12-29T15:40:37+5:302016-12-29T15:40:37+5:30
सोयाबीन किंवा इतर शेतमाल विक्रीसाठी आणल्यावर संबधित व्यापारी, आडते हे शेतक-यांना नगदी पैसे पाहिजे असल्यास २०० ते ३०० रुपये कमी भावाने शेतमाल खरेदी करीत आहेत

कॅशलेस व्यवहाराचा मालेगावात शेतक-यांना बसतोय फटका
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि.29 - केंद्र सरकारने नोटांबंदीनंतर कॅशलेस व्यवहार करण्यावर भर दिला, याचा फटका तालुक्यातील शेतक-यांना शेतमाल विकताना बसत आहे. सोयाबीन किंवा इतर शेतमाल विक्रीसाठी आणल्यावर संबधित व्यापारी, आडते हे शेतक-यांना नगदी पैसे पाहिजे असल्यास २०० ते ३०० रुपये कमी भावाने शेतमाल खरेदी करीत आहेत. तालुक्यात यावर्षी खरीप पिकासाठी योग्य पाऊस झाला. त्यामुळे मूग, उडीद, सोयाबीन या पिकांचे चांगले उत्पन्न झाले.
नोटाबंदीनंतर शेतकरी जर माल विकण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किंवा व्यापारी यांच्याकडे गेले असता, त्यांना व्यापारी म्हणतायेत, चेकने पैसे घेतले तर पूर्ण भावाने देऊ आणि जर नगदी पैसे पाहिजे असल्यास २०० ते ३०० रुपये कमी भावाने मिळतील. काही शेतक-यांचे खाते बँकामध्ये नसल्याने ते चेकने, धनादेशाने पैसे घेऊ शकत नाहीत, अशावेळी ते नगदी पैशाची मागणी करतात. यामुळे शेतक-यांचे नुकसान होत आहे.
शेतक-यांना लिलावामधील दराने पैसे देण्यात यावे, ज्या शेतक-यांकडे बँकेचे खाते नाही त्यांना खाते काढेपर्यंत तरी नगदीत पण पूर्ण रक्कम देण्यात यावी - तुकाराम गावंडे, शेतकरी
व्यापा-यांनी योग्य दराने खरेदी करुन नियमानुसार पैसे दयावयास पाहिजे. कधी कधी व्यापारी यांच्याकडे पैसे नसतात, त्यामुळे शेतकºयांनी बँकेत खाते उघडणे गरजेचे आहे. -बबनराव चोपडे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती