रोकड टंचाईत अडकली पीक कर्जाची रक्कम!
By Admin | Updated: April 24, 2017 02:20 IST2017-04-24T02:20:10+5:302017-04-24T02:20:10+5:30
शेतकरी हतबल : बाजारपेठेत धनादेशही स्वीकारेनात!

रोकड टंचाईत अडकली पीक कर्जाची रक्कम!
वाशिम : नोेटाबंदीच्या निर्णयानंतर आता एप्रिल महिन्यात रोकड टंचाई निर्माण झाल्याचा जबर फटका शेतकऱ्यांसह सर्वच घटकातील नागरिकांना बसत आहे. ११८ कोटी रुपयांपेक्षा जास्त पीक कर्ज वाटप झाले असले, तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हाती मात्र रक्कम पडली नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजेपासून चलनातील ५०० आणि हजारच्या नोटा रद्द ठरविल्या. साधारणत: जानेवारी महिन्याच्या पंधरवड्यापर्यंत रोकड टंचाईची झळ सर्वांनाच सोसावी लागली. त्यानंतर बऱ्यापैकी पूर्वपदावर आलेले व्यवहार, एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुन्हा विस्कळीत होत असल्याचे दिसून येत आहे. गत १५ दिवसांपासून जिल्ह्यात रोकडटंचाई निर्माण झाल्याने रोखीचे व्यवहार मंदावले आहेत. रोकड टंचाईचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. ७ एप्रिलपासून खरीप पीक कर्ज वितरणाला सुरुवात झाली. पीक कर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जात असल्याने आणि रोकड टंचाईमुळे दोन ते चार हजारांपेक्षा जास्त रकमेचा ‘विड्रॉल’ होत नसल्याने पीक कर्जाची रक्कम बँक खात्यातच पडून आहे.
जिल्ह्यात यावर्षी दीड लाख शेतकऱ्यांना सर्व बँका मिळून एकंदरित ११५० कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्याचे नियोजन करण्यात आले. २१ एप्रिलपर्यंत ११८ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे पीक कर्ज वाटप झाले असून, १५ हजार शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला. मात्र, बँकेतून विड्रॉल होत नसल्याने पीक कर्जाची रक्कम बँकेतच पडून राहत आहे. दुसरीकडे दैनंदिन व्यवहारासाठी बाजारपेठेत धनादेश स्वीकारण्यासाठी व्यापाऱ्यांचंी उत्सुकता नसल्याने शेतकऱ्यांसमोर पेच निर्माण झाला आहे. बँक खात्यात पैसा असूनही, रोकड टंचाईमुळे पेरणीयोग्य साहित्याची खरेदी करण्यात व्यत्यय निर्माण झाला. रोकड टंचाईच्या संकटाने शेतकरी पुरता हैराण झाला आहे.
‘एटीएम सेवा’ विस्कळीत
रोकडअभावी जिल्ह्यातील एटीएम सेवाही विस्कळीत आहे. वाशिम शहरासह कारंजा, मंगरूळपीर, मानोरा, मालेगाव, रिसोड, शिरपूर जैन, शेलुबाजार, रिठद, केशवनगर आदी प्रमुख ठिकाणच्या बहुतांश एटीएममध्ये ठणठणाट आहे. शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशी तर संपूर्ण एटीएम सेवा ठप्प होती.
केवळ चार ठिकाणी ‘तिजोरी’!
रोकड ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेतर्फे प्रत्येक जिल्ह्यात ‘तिजोरी’ची व्यवस्था केली जाते. वाशिम जिल्ह्यात केवळ चार ठिकाणी तिजोरीची व्यवस्था असल्याने पुरेशा प्रमाणात रोकड ठेवता येत नाही. वाशिम, कारंजा, रिसोड व मंगरूळपीर येथे रिझर्व्ह बँकेची तिजोरी असून, उर्वरित कुठेही तिजोरी नाही. यामुळेदेखील रोकडचा प्रश्न निर्माण होत आहे.
लग्नसराईच्या खरेदीलाही फटका
जिल्ह्यातील रोकड टंचाईचा फटका लग्नसराईच्या खरेदीला मोठ्या प्रमाणात बसत आहे. रोकड उपलब्ध नसल्याने विविध प्रकारची साहित्य खरेदी करताना सर्वसामान्यांची दमछाक होत आहे. लग्नसराईच्या खरेदीसाठी ‘धनादेश’ स्वरुपात रक्कम स्वीकारण्यास व्यापारी फारसे उत्सुक नसल्याने रोकडअभावी सर्वसामान्य नागरिक वैतागले आहेत.
नागपूर येथील रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांशी रोकड टंचाईसंदर्भात बोलणी झाली आहे. जिल्ह्यात असलेल्या रोकड तुटवड्याविषयी त्यांना माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांना पीक कर्ज अदा करण्यात येणाऱ्या अडचणीदेखील त्यांच्यासमोर मांडल्या. याची दखल त्यांच्याकडून घेण्यात आली आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात जिल्ह्यात आरबीआयकडून पुरेशा रोकडचा पुरवठा होणार आहे.
-व्ही.एच. नगराळे, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक
एप्रिल महिन्यापासून रोकड टंचाई निर्माण झाल्याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. कृषी सभापती या नात्याने यासंदर्भात शेकडो शेतकऱ्यांनी आपल्याकडे तक्रारी मांडल्या. शेतकऱ्यांची रास्त मागणी लक्षात घेता अग्रणी बँक व जिल्हा प्रशासनाशी यासंदर्भात चर्चा केली. येत्या आठवड्यात रोकड उपलब्ध न झाल्यास शेतकऱ्यांच्यावतीने अनोखे आंदोलन केले जाईल.
- विश्वनाथ सानप, सभापती, कृषी व पशुसंवर्धन, जिल्हा परिषद वाशिम