मांसाची वाहतूक करणारे दोन ट्रक पकडले
By Admin | Updated: November 29, 2014 00:28 IST2014-11-29T00:28:18+5:302014-11-29T00:28:18+5:30
वाशिम येथे संतप्त जमावाची ट्रकवर दगडफेक

मांसाची वाहतूक करणारे दोन ट्रक पकडले
वाशिम : येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठय़ा शिताफीने जनावरांच्या मांसाची अवैधरीत्या वाहतूक करणारे दोन ट्रक राजगाव परिसरात पकडले. यापैकी एक ट्रक शहरातील पोस्ट ऑफिस चौकामधून पळविण्याचा प्रयत्न झाल्याने अज्ञात जमावाकडून ट्रकवर दगडफेक करण्यात आली. ही घटना २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान घडली. नागपूर व अमरावती येथून जनावरांची कत्तल करून त्याचे मांस हिंगोली येथे पोहोचविण्याचा गोरखधंदा गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे. २८ नोव्हेंबर रोजी दोन ट्रकमध्ये गायीच्या मांसाची वाहतूक होत असल्याचा संशय आल्याने काही सामाजिक कार्यकर्त्यांनी राजगाव परिसरात दोन्ही ट्रक पकडून ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. एम.पी. १६ जी.ए. ११७७ व एम.एच. ४३ वाय ६४३ या क्रमांकाचे दोन ट्रक ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले. यामधील एक ट्रक हिंगोली रोडवरील पाण्याच्या टाकीपासून दोन तीन तासापर्यंत गायब झाला होता. रात्री उशिरा ग्रामीण पोलिसांनी हा ट्रक ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये आणून उभा केल्याने वातावरण शांत झाले. यामधील दुसरा ट्रक (एम.पी. १६ जी.ए. ११७७) वाशिम शहरामधील पोस्ट ऑफिस चौकापर्यंत आला; मात्र याठिकाणी काही युवकांनी ट्रकवर कारवाई करू नये, अशी भूमिका घेऊन ट्रकचालकाला अभय देण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोस्ट ऑफिस चौकामध्ये संतप्त झालेल्या जमावाने ट्रकवर दगडफेक करून ट्रकच्या काचा फोडल्या. यादरम्यान ट्रकचालक व क्लिनर घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेमुळे पोस्ट ऑफिस चौकामध्ये वाहतूक अध्र्या तासासाठी खोळंबली होती. लगेचच शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्राम सांगळे व शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळ गाठून जमाव पांगविण्याचा प्रयत्न करीत असताना अज्ञात इसमाच्या दगडफेकीत एपीआय श्रीराम पवार किरकोळ जखमी झाले. पोलिसांनी क्षतिग्रस्त झालेला ट्रक वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये उभा केला. वृत्त लिहिस्तोवर शहर व ग्रामीण या दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल केला नव्हता. सुमारे एक- दोन तास नागरिकांनी पोलीस स्टेशनमध्ये गर्दी केली होती.