उमेदवारांनी साधली प्रचाराची सोनेरी संधी
By Admin | Updated: October 5, 2014 01:54 IST2014-10-05T01:41:40+5:302014-10-05T01:54:48+5:30
दस-याच्या शुभेच्छा देण्याच्या पदराआड केला स्वत:चा प्रचार.

उमेदवारांनी साधली प्रचाराची सोनेरी संधी
वाशिम : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसर्याचा मुहूर्त साधत ३ ऑक्टोबरला सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रचाराचे सोने वाटले. दसर्याच्या शुभेच्छा देण्याचा पदराआड या उमेदवारांनी मतदारांशी संवाद साधून स्वत:च्या प्रचाराची नामी संधी कॅश केली असल्याचे चित्र जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात दिसून आले.
आगामी १५ ऑक्टोंबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे. उमेदवार नाना फंड्यांच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही उमेदवारांनी तर डोअर टु डोअर प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. मात्र, घरी भेटत नसलेले मतदार त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. गांधी जयंती व दसरा सलग आल्याने उमेदवारांना ही मोठी संधी उपलब्ध झाली होती. ही संधी कॅश करीत उमेदवारांनी मतदारांच्या घरी जाऊन भेटीगाठी घेतल्या. दसर्यासाठी शुभेच्छा देतानाच मत मागण्यात आले आहे. वाशिम जिल्ह्यातील वाशिम, कारंजा व रिसोड या तिन्ही मतदारसंघात हा प्रकार पाहावयास मिळाला. वाशिम मतदारसंघातील उमेदवारांनी तर काही निवडक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सकाळपासूनच मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्याचे दिसून येत होते. रात्री उशीरापर्यंत हे उमेदवार मतदारांना शुभेच्छा देण्यासाठी शहरात फिरत असल्याचे दिसून येत होते.