उमेदवारांची धाकधूक वाढली; प्रतीक्षा उद्याच्या निकालाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:35 IST2021-01-17T04:35:19+5:302021-01-17T04:35:19+5:30
या निवडणुकीत अनेक दिग्गजांचे अस्तित्व पणाला लागले आहे. तालुक्यातील आमदार अमित झनक यांचे मूळगाव असलेले मांगूळ या गावी काट्याची ...

उमेदवारांची धाकधूक वाढली; प्रतीक्षा उद्याच्या निकालाची
या निवडणुकीत अनेक दिग्गजांचे अस्तित्व पणाला लागले आहे. तालुक्यातील आमदार अमित झनक यांचे मूळगाव असलेले मांगूळ या गावी काट्याची लढत असल्याची चर्चा गावातून ऐकायला मिळत आहे. या ठिकाणी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती उपसभापती माधव ठाकरे व आमदार अमित झनक यांचे काका पंडितराव झनक, तसेच भाजपचे केशवराव बाजड ,दत्तराव झनक, पंचायत समिती सदस्य भूषण दांदळे यांच्यात लढत झाल्याचे समजते. तालुक्यातील सवड येथे चुरस असल्याचे बोलले जात आहे. या ठिकाणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गजाननराव लाटे यांनी ग्रामपंचायतीच्या सर्व जागा आमच्याच निवडून येतील, असा दावा केला आहे. ग्राम चिखलीमध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य स्वप्निल सरनाईक व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दिलीपराव सरनाईक यांच्या पॅनेलमध्ये काट्याची टक्कर असून, जिल्हा परिषदेचे सदस्य स्वप्निल सरनाईक यांनी ग्रामपंचायतीवर आमच्या पॅनेलचे वर्चस्व राहील, असा दावा केला आहे. तालुक्यातील वाकद येथे जिल्हा परिषदेचे सदस्य सुजाता देशमुख व जिल्हा परिषद माजी सदस्य रावसाहेब देशमुख व वंचितचे तालुकाध्यक्ष सय्यद अकील यांच्या पॅनेलमध्ये काट्याची टक्कर असल्याचे बोलले जात आहे. अर्ज भरण्यापासून तर मतदान होईपर्यंत कुठे न कुठे छोटे-मोठे वाद व आरोप-प्रत्यारोपाने गाजलेली पळसखेड ग्रामपंचायतीकडे विशेष लक्ष लागून आहे. या ठिकाणी पंचायत समितीचे उपसभापती सुभाष भुजंगराव खरात, माणिकराव पाटील, अंबादास खरात विरोधात अर्जुन खरात अशी लढत आहे.
३४ ग्रामपंचायतींपैकी कंकरवाडी व मोप ग्रामपंचायत अविरोध झालेले आहे, ही सद्य:स्थितीत चर्चेचा विषय आहे. खरं पाहिला तर दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये कोणताही मातब्बर नेता पदाधिकारी नाही. या ग्रामपंचायती सर्वसामान्य जनतेच्या आपसी समजूतीनेच अविरोध झाल्या. मात्र, विविध ठिकाणी आमदार, माजी आमदार, माजी खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व विविध पक्षांचे मोठे राजकीय नेत्यांच्या गावात मात्र तुल्यबळ लढतीचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मात्र, या दोन्ही गावांनी एक वेगळाच आदर्श घडवून आणलेला असल्यामुळे दोन्ही ग्रामपंचायतीचे कौतुक होत आहे.