महावितरण कंपनीमधील स्वेच्छानवृत्ती योजना रद्द
By Admin | Updated: August 23, 2014 02:10 IST2014-08-23T01:00:58+5:302014-08-23T02:10:48+5:30
वाशिम जिल्ह्यातील महावितरणच्या कामगारांमध्ये अस्वस्थता: ऊर्जा मंत्र्यांकडे लक्ष देण्याची मागणी.

महावितरण कंपनीमधील स्वेच्छानवृत्ती योजना रद्द
वाशिम :महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून कर्मचार्यांच्या वयाच्या ४५ वर्षांनंतर, तसेच सेवा संपण्यास किमान दोन वर्षे कालावधी उरला असताना स्वेच्छानवृत्ती घेण्याची मुभा देणारी योजना अचानकपणे रद्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे कंपनीतील कामगारांत खळबळ उडाली असून, याप्रकरणी उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्र्यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेकडून करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने ३१ जुलै २0१४ रोजी परिपत्रक क्रमांक ४९४ नुसार ४५ वर्षे वय पूर्ण झालेल्या, तसेच दोन वर्षे सेवा शिल्लक असलेल्या वर्ग ३ आणि ४ च्या कर्मचार्यांसाठी स्वेच्छानवृत्ती योजना लागू केली. कंपनीचे अध्यक्ष, तसेच व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या बैठकीत या संदर्भातील ठरावाला मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे राज्यातील सर्व झोनमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले; परंतु कंपनीच्या २0 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या बैठकीत ऐन वेळी मांडलेल्या विषयामध्ये ही बहुचर्चित योजना क ोणतेही ठोस कारण न देता परिपत्रक क्रमांक २६१४८ काढून रद्द करण्यात आली. या निर्णयामुळे वीज वितरण कंपनीतील कामगारांमध्ये एकच खळबळ उडाली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ऊर्जामंत्र्यांनी हस्तक्षेप करून ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही योजना का रद्द करण्यात आली. यासंदर्भात चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कर्मचारी संघटनेकडून करण्यात आली आहे. संघटनेच्या शिष्टमंडळाने १९ ऑगस्ट रोजी कंपनीचे अध्यक्ष, तसेच व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता यांची भेट घेऊन स्वेच्छानवृत्ती योजनेतील त्रुटींसदर्भात चर्चा केली असता. त्यामध्ये त्रुटी असल्याचे मान्य करीत योजनेचे परिपत्रक तूर्त स्थगित करणार असल्याचे त्यांनी सांगितले; परंतु ही योजनाच रद्द करून कंपनीने कामगारांच्या भावनांशी खेळ केल्यामुळे येत्या ११ सप्टेंबर रोजी अकोला येथे संघटनेच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा करून पुढील आंदोलनाचा निर्णय घेण्यात येणार आहे.