वृक्ष संवर्धनासाठी विकतच्या पाण्याचा वापर!
By Admin | Updated: April 12, 2017 01:41 IST2017-04-12T01:41:20+5:302017-04-12T01:41:20+5:30
ध्यास पर्यावरण रक्षणाचा: मुंंगळा येथील पशूधन अधिकाऱ्याची धडपड!

वृक्ष संवर्धनासाठी विकतच्या पाण्याचा वापर!
मुंगळा : येथील पशूवैद्यकीय दवाखान्यात जुलै महिन्यात वृक्ष लागवड अभियानांतर्गत वृक्षांची लागवड करण्यात आली; परंतु आता रखरखत्या उन्हात पाण्याअभावी लावलेले वृक्ष सुकण्याच्या मार्गावर असल्याने येथील पशुधन अधिकारी डॉ. राजेश बोरकर हे स्वत: या वृक्षांना विकतचे पाणी घालून ती वाचविण्यासाठी धडपड करीत आहेत.
झाडे लावा झाडे जगवा असा संदेश शासन, प्रशासनाच्यावतीने नेहमीच दिला जातो. परंतु लावलेली झाडे जगली की नाही, ते मात्र कोणीही पाहत नाही.अनेक सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते झाडे लावण्यापुरते पुढे येतात. ते झाड जगले की, वाळले याचे मात्र त्यांना काही देणे घेणे नाही. या प्रकाराला मुंगळा येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुधन अधिकारी डॉ. राजेश बोरकर हे अपवाद ठरले असून, आपल्या पशुवैद्यकीय दवाखान्यात लावलेले रोपटे जगवण्यासाठी ते धडपड करीत आहेत. पशुवैद्यकीय दवाखान्यात जुलै महिन्यात वृक्षारोपण करण्यात आले. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने या वृक्षांच्या रोपट्यांना पाणी घालणे आवश्यक आहे. पाण्याअभावी रोपे सुकत असल्याने पशुधन अधिकारी डॉ. राजेश बोरकर ही रोपे जगविण्यासाठी विकतचे पाणी घेवुन झाडाला जगविण्यासाठी धडपड करीत आहेत. एवढेच नाही तर त्यांनी पशुवैद्यकीय दवाखान्यात रोपांभोवती स्वखर्चाने ट्री गार्ड बसविले आहेत. विशेष म्हणजे या रोपांची ते स्वत: निगा राखतात. त्यांच्या सोबतीला परिचर जगदेव राठोड, सहकारी सुधाकर वानखडे, गणेश वाघ हे सुद्धा मदत करतात. मागील वर्षी एकच लक्ष दोन कोटी वृक्ष योजने अंतर्गत जिल्ह्यात लाखो झाडे लावण्यात आली. परंतु, या झाडाच्या संवर्धनासाठी सामाजिक संस्था, संघटना, प्रशासनाने देखील दुर्लक्ष केले. दुसरीकडे पशुधन अधिकारी डॉ. राजेश बोरकर सारखे उच्चपदस्थ अधिकारी स्वत: झाडाची निगा राखुन ते जगविण्यासाठी आटापिटा करीत असल्याचे पाहावयास मिळते.