संचारबंदीमुळे व्यावसायिकांची उलाढाल ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:42 IST2021-05-12T04:42:17+5:302021-05-12T04:42:17+5:30
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन कडक निर्बंध घोषित करीत आहे. गतवेळी व्यवसाय भरभराटीच्या कालावधीतच लॉकडाऊन ...

संचारबंदीमुळे व्यावसायिकांची उलाढाल ठप्प
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन कडक निर्बंध घोषित करीत आहे. गतवेळी व्यवसाय भरभराटीच्या कालावधीतच लॉकडाऊन लागू करण्यात येत आहे. यामुळे व्यावसायिक अडचणीत आले होते. व्यावसायिकांनी दुकाने थाटण्यासाठी पतसंस्था, बँका अन्य संस्थांचे कर्ज घेतले आहेत. यंदाही कोरोना संसर्ग वाढल्याने कडक निर्बंध आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात चालणारे हंगामी व्यवसाय बंद राहत असल्याने कर्ज फेडण्याची चिंता अनेकांना सतावत आहे. गेल्या वर्षांपासून ऐन सणासुदीत व्यवसायही ठप्प होते. यामुळे व्यावसायिकांवर बेरोजगारीचे संकट कोसळले आहे. गेल्या वर्षीच्या काहींना व्यवसाय पुनर्जीवित करण्यासाठी बँकांची दारे ठोठवावी लागली. मात्र, आता पुन्हा कडक निर्बंध घोषित करण्यात आल्याने व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. शासन स्तरावर शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य वितरित करण्यात येत आहेत. परंतु व्यावसायिकाच्या कर्जाचा विचार कुणी करीत नाही. यामुळे अनेक व्यावसायिकांना कर्ज फेडण्यासाठी दागदागिने सावकाराकडे गहाण ठेवावे लागत आहेत. व्यावसायिकांपाठोपाठ रोजगार शोधून उदरनिर्वाह करणाऱ्या कामगार, मजुरांचेसुद्धा हाल होत आहेत. कर्ज थकले असताना व्याज मात्र सुरूच आहे. व्यावसायिकांच्या समस्या, लक्षात घेत सरकारने मदत करावी, अशी मागणी आहे.