In the bus, the technical failure, the traffic of the passengers in the sun, the hour-and-a-half hours detention | बसमध्ये तांत्रिक बिघाड, प्रवाशांचे उन्हात हाल, तास-दीड तास खोळंबा
बसमध्ये तांत्रिक बिघाड, प्रवाशांचे उन्हात हाल, तास-दीड तास खोळंबा

वाशिम: राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) नादुरुस्त बसगाड्यांचा फटका वेळोवेळी प्रवाशांना बसत आहे. त्यात महामार्गांच्या कामांमुळेही बसगाड्यांत बिघाड घडत असून, असाच प्रकार बुधवारी वाशिम-मंगरुळपीर मार्गावर पुन्हा घडला. तांत्रिक बिघाडामुळे बस बंद पडल्याने रखरखत्या उन्हात प्रवाशांना तास दीडतास त्रास सहन करावा लागल्याचे पाहायला मिळाले.
एसटी महामंडळाच्या अनेक बसगाड्यांची अवस्था वाईट असतानाही पुरेशा पडताळणीअभावी त्या बसगाड्या मार्गावर धावताना दिसत आहेत. यामुळे ऐन प्रवासादरम्यान या बस बंद पडून प्रवाशांचा खोळंबा होतो. तसेच कधी पावसाळ्यात भर पाण्यात, कधी हिवाळ्यात थंडीत कुडकुडत, तर कधी उन्हाळ्यात रखरखत्या उन्हात प्रवाशांना दुसºया बसची प्रतिक्षा करावी लागतेच शिवाय महत्त्वाच्या कामांसाठी जाणाºयांच्या अडचणीतही भर पडते. एसटी बसगाड्यांची अवस्था आधीच वाईट असताना महामार्गाच्या कामांत झालेल्या खाचखळग्यांमुळे बसमध्ये वारंवार बिघाड घडून बसगाड्या बंद पडण्याच्या घटनाही घडत आहेत. असा प्रकार पुन्हा एकदा बुधवारी वाशिम-मंगरुळपीर मार्गावर पाहायला मिळाला. कारंजा आगाराची औरंगाबाद-कारंजा ही एमएच-४० एक्यू-६३४४ ही बस बिटोडा भोयरपासून काही अंतरावर तांत्रिक बिघाडामुळे दुपारी १.३० वाजताच्या सुमारास बंद पडली. बसच्या चाकाला आधारासाठी असलेला स्प्रिंग पट्टा तुटल्याने ही बस थांबवावी लागली. महामार्गाच्या कामांसाठी आधीच मोठमोठी झाडे तोडली असताना बस बंद पडल्यानंतर प्रवाशांना उभे राहण्यासाठी सावलीचाही आधार नव्हता. त्यामुळे बसमधील प्रवाशांना तास दीड तास प्रवाशांना रखरखत्या उन्हात ताटकळत उभे राहावे लागले. 
------------
चिमुकल्यांचे हाल 
कारंजा आगाराची बसगाडी वाशिम-मंगरुळपीर दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे बंद पडल्यानंतर बसमधील प्रवाशांना रखरखत्या उन्हात उभे राहावे लागले. झाडांच्या सावलीचा आधार नसतानाच जवळपास घसा ओला करण्यासाठी पाण्याची सोयही नव्हती. त्यामुळे प्रवाशांसोबत असलेल्या चिमुकल्यांचे हाल झाल्याचे दिसले. एक चिमुकला उन्हाचा त्रास सहन होत नसल्याने रडत असल्याचेही यावेळी दिसले.


Web Title: In the bus, the technical failure, the traffic of the passengers in the sun, the hour-and-a-half hours detention
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.