बसस्थानकांतील सुरक्षा व्यवस्था वा-यावर!
By Admin | Updated: February 14, 2017 01:50 IST2017-02-14T01:50:19+5:302017-02-14T01:50:19+5:30
बेवारस वस्तूंवर देखरेख नाही : पोलिसांचा ‘वॉच’ही नाही!

बसस्थानकांतील सुरक्षा व्यवस्था वा-यावर!
कारंजा/रिसोड/मंगरूळपीर : बसस्थानकांतील बेवारस वस्तूंपासून काही अनर्थ घडू नये म्हणून पोलीस व सुरक्षा रक्षकांचा पहारा असतो. या रक्षकांचा पहारा किती प्रामाणिक आहे, याची पडताळणी म्हणून ह्यलोकमतह्णने कारंजा, रिसोड व मंगरूळपीर आगारात सोमवारी स्टिंग केले असता, तब्बल एक ते दोन तास बेवारस वस्तू तशाच पडून असल्याचे दिसून आले.
आतंकवादी किंवा समाजकंटकाद्वारे गर्दीच्या ठिकाणी घातपात घडवून आणण्याच्या घटना यापूर्वी राज्यातील काही ठिकाणी घडल्या आहेत. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून रेल्वे व बसस्थानक परिसरात पोलीस व सुरक्षा रक्षकांचा ह्यवॉचह्ण ठेवण्यात आला आहे. यानुसार जिल्ह्यातील आगारांत पोलीस कर्मचारी तसेच आगाराचे स्वत:चे रक्षक तैनात आहेत. सुरक्षा यंत्रणेद्वारा बसस्थानकांत खरोखरच देखरेख ठेवली जाते का? याची पडताळणी म्हणून लोकमतच्या चमूने बुधवारी कारंजा, रिसोड व मंगरूळपीर आगारात बेवारस वस्तू ठेवून याकडे कुणाचे लक्ष जाते का, सुरक्षा रक्षक या प्रकाराला प्रतिबंध घालतो का, यासंदर्भात स्टिंग केले. यावेळी कोणत्याही बसस्थानकात सुरक्षा रक्षक किंवा पोलीस कर्मचारी आढळून आला नाही. बसस्थानकातील आसनावर बेवारस वस्तूची पिशवी ठेवल्यानंतरही कुणी हटकले नाही किंवा या पिशवीची पाहणीदेखील केली नाही. एक ते दोन तास ही बेवारस पिशवी तशीच पडून होती. यावरून बसस्थानकांतील सुरक्षा व्यवस्था किती गाफील आहे, हे दिसून आले.