जलशुद्धीकरणाच्या ब्लिचिंग पावडरचा गोरखधंदा!
By Admin | Updated: May 25, 2015 02:46 IST2015-05-25T02:46:15+5:302015-05-25T02:46:15+5:30
जलस्रोत तपासणी ; ४२ नमुन्यात बोगस ब्लिचिंग पावडर

जलशुद्धीकरणाच्या ब्लिचिंग पावडरचा गोरखधंदा!
संतोष वानखडे / वाशिम : जलशुद्धीकरणाच्या ब्लिचिंग पावडरमध्ये गोरखधंदा करून, काहींनी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ मांडला असल्याचे धक्कादायक वास्तव जलस्रोत तपासणीतून चव्हाट्यावर आले आहे. जानेवारी ते एप्रिल २0१५ या कालावधीत तब्बल ४२ जलस्रोतांमध्ये वापरण्यात आलेले ब्लिचिंग पावडर बोगस असल्याचे निष्पन्न झाले आहे. अशुद्ध पाण्यातून जलजन्य आजार उद्भवण्याची शक्यता गृहित धरून जलस्रोतांमध्ये ब्लिचिंग पावडर टाकण्याच्या सूचना आरोग्य विभागाने ग्रामपंचायत प्रशासनाला दिलेल्या आहेत. शुद्ध पाणीपुरवठय़ासाठी पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडर वापरणे मानवी आरोग्याच्या दृष्टिकोनातून हितावह आहे; मात्र ब्लिचिंग पावडरच्या खरेदीमध्येही अनेक ग्रामपंचायती हात आखडता घेण्यात धन्यता मानत असल्याचे जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेच्या तपासणीतून समोर येत आहे. आयएसआय ट्रेडमार्क असलेल्या ग्रेड वन ३४ किंवा ग्रेड टू ३२ ही ब्लिचिंग पावडर वापरावी, अशा सूचना ग्रामपंचायत स्तरावरील जलसुरक्षकांना दिलेल्या आहेत. तथापि, अनेक ग्रामपंचायतींनी हलक्या दर्जाच्या ब्लिचिंग पावडरचा पुरवठा करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ मांडला आहे. हलक्या दर्जाच्या ब्लिचिंग पावडरचा पुरवठा कोणती कंपनी करीत आहे, या कंपनीचे व्यापारी कोण, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. जानेवारी महिन्यात १७१ जलस्रोतांपैकी १४ जलस्रोतांमधील ब्लिचिंग पावडर बोगस असल्याचे आढळून आले. याप्रमाणे फेब्रुवारीमध्ये १९२ पैकी १२, मार्चमध्ये १७0 पैकी ७ आणि एप्रिलमध्ये १८५ पैकी ९ जलस्रोतांमधील ब्लिचिंग पावडरमध्ये क्लोरीन २0 टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे आढळून आले आहे.