अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा-या पित्यास जन्मठेप
By Admin | Updated: November 30, 2014 00:24 IST2014-11-29T21:53:05+5:302014-11-30T00:24:08+5:30
अकोला सत्र न्यायालयाचा निर्णय; अनाथ मुलीला भीक मागण्यासही केले होते बाध्य.
_ns.jpg)
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा-या पित्यास जन्मठेप
अकोला - अनाथ मुलीला भीक मागण्यास बाध्य करून तिच्यावर शारीरिक अत्याचार करणार्या मानलेल्या नराधम बाप मधुकर मानाजी आठवले याला जिल्हा व सत्र न्यायालयाने शनिवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यासोबतच आरोपीला एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आणि दंड न भरल्यास आणखी दोन महिन्याची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.एन. तांबी यांच्या न्यायालयाने सुनावली.
सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृषिनगर येथील रहिवासी मधुकर मानाजी आठवले (६0) याने मानलेल्या १५ वर्षीय मुलीला भीक मागण्यास बाध्य केले होते. तसेच २६ सप्टेंबर २0१२ च्या सहा महिन्यापूर्वी ही मुलगी आठवले याच्या नातेवाईकाच्या घरी झोपलेली असताना आठवले याने १५ वर्षीय मुलीवर बलात्कार केला. या प्रकाराला मुलीने विरोध केला असता त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर घाबरलेल्या मुलीने कधीही विरोध न केल्याने या नराधमाने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. त्यामुळे मुलगी गर्भवती राहिली. २६ सप्टेंबर २0१२ रोजी तिने सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे मधुकर आठवले याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३७६, ५0६, नुसार गुन्हा दाखल केला. त्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली. तेव्हापासून आरोपी प्रथम पोलीस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडीत आहे.
दरम्यान पीडित मुलगी, तिचे नातेवाईक, डॉक्टर आणि तपास अधिकारी यांच्या बयाणावरुन आणि ठोस पुरावे मिळाल्याने मधुकर आठवले याच्याविरुद्ध आणखी कलम ३६३ व बैगिंग अँक्टनुसार गुन्हे वाढविण्यात आले. पोलिसांनी तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी झाली असून, शनिवारी मधुकर आठवले याला शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एन. तांबी यांच्या न्यायालयाने मधुकर आठवलेस कलम ३७६ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अँड. मंगला पांडे यांनी कामकाज पाहिले.