कृषी विद्यापीठांतील नोकर भरतीला खीळ !
By Admin | Updated: November 9, 2014 23:46 IST2014-11-09T23:42:07+5:302014-11-09T23:46:13+5:30
नोकर भरती निवड मंडळ वर्षभरापासून कार्यरत नाही.

कृषी विद्यापीठांतील नोकर भरतीला खीळ !
राजरत्न सिरसाट
अकोला : राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमधील पदे भरण्यासाठी राज्य शासनाने वर्षभरापूर्वी महाराष्ट्र कृषी विद्यापीठ नोकर भरती मंडळाची स्थापना केली होती; परंतु या मंडळाचे कामकाज अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे कृषी संशोधक तसेच कर्मचारी यांच्या भरती प्रक्रियेला जवळपास खीळ बसली असून, त्याचा थेट परिणाम कृषी संशोधनावर होत आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि डॉ. बाळासाहेब सांवत कृषी विद्यापीठ दापोली अशी राज्याच्या चार विभागांत कृषी विद्यापीठे आहेत. या विद्यापीठांद्वारे महत्वाचे कृषी संशोधन केले जाते; तथापि अलिकडच्या दहा वर्षांत या विद्यापीठांमधील रिक्त पदांची संख्या वाढली आहे. एकट्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची भरती प्रक्रिया १९९0पासून रखडलेली असून तेथे अधिष्ठाता, संशोधन संचालक, प्राध्यापक या मुख्य पदांसह पावणेदोन हजार पदे रिक्त आहेत. कृषी विद्यापीठांचे कुलगुरू किंवा माजी कुलगुरू ंचा महाराष्ट्र राज्य कृषी विद्यापीठ नोकर भरती मंडळात समावेश नाही, हे विशेष.
कृषी विद्यापीठांची भरती प्रकिया रखडल्याने संशोधनावर परिणाम होत आहे. जुन्याच पद्धतीने नोकर भरती प्रक्रिया राबविण्यात यावी, यावर राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंचे एकमत आहे. याबाबत कृषी विद्यापीठांचे कुलप ती तथा राज्यपालांची भेट घेण्यात आली असून, लवकरच नोकरभरतीबाबत निर्णय होण्याची शक्यता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांनी व्यक्त केली.
*पूर्वीची भरती प्रक्रिया
नोकर भरती मंडळ स्थापन होण्यापूर्वी कनिष्ठ, वरिष्ठ संशोधन सहाय्यक ते सहयोगी प्राध्यापकांची पदे भरण्याचे अधिकार कृषी विद्यापीठांना होते. नोकर भर ती मंडळाच्या स्थापनेनंतर हे अधिकार काढण्यात आले आहेत.