पुलाच्या कडा खचल्या!
By Admin | Updated: November 21, 2014 01:25 IST2014-11-21T01:25:01+5:302014-11-21T01:25:01+5:30
रस्ते विकास महामंडळ दुर्लक्ष

पुलाच्या कडा खचल्या!
मंगरुळपीर : नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गावरील तर्हाळा गावानजीक पुलाच्या कडा खचल्या असून, या रस्त्यावर मोठे-मोठे खड्डे पडले आहे. परिणामी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे; मात्र याकडे रस्ते विकास महामंडळ दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
नागपूर ते औरंगाबाद द्रुतगती मार्गाच्या शेलूबाजार, तर्हाळा, लाठी वळण रस्त्याचे बांधकाम लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे अर्धवट अवस्थेत पडले आहे. वळण रस्त्याची निर्मिती व्हावी, अशी मागणी मागील कित्येक वर्षांपासून होत असताना लोकप्रतिनिधी सातत्याने पाठपुरावा करीत नाही. तसेच प्रशासन सुस्त असल्याने या तीनही गावातील नागरिकांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान, तर्हाळानजीकच्या अरुंद पुलाजवळ आजपर्यंत तीन वाहनचालकांचा अपघातामुळे बळी गेला.
सदर घटना संबंधित विभागाच्या वेळकाढू धोरणामुळे घडल्याचा आरोप नागरिक करीत आहे. आता त्याच ठिकाणच्या पुलाच्या कडा तुटून पडल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, पुलाच्या कडा खचल्याची माहिती रस्ते विकास महामंडळाला खरेच नसावी का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. यापूर्वी त्याच भागातील रस्त्याची डागडुजी झाली. त्यावेळी अरुंद पुलाच्या दोन्ही बाजूंनी सुरक्षा भिंत घेणे आवश्यक होते; मात्र त्या बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आले.
परिणामी आज द्रुतगती मार्गावर सुसाट वेगाने धावणार्या वाहनधारकांना अरुंद पुलाची कल्पना येत नाही. अचानक त्या ठिकाणी चालकाची धांदल उडाल्याचे प्रकार घडत आहेत. द्रुतगती मार्गाच्या निर्मितीनंतर रस्ते विकास महामंडळाने या भागातील रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. वळण रस्त्यासंदर्भात ठोस पाठपुरावा केल्या जात नाही. जिल्हय़ातील लोकप्रतिनिधीने वळण रस्त्याबाबत पाठपुरावा केला, तर निश्चित यश पदरी पडू शकते; परंतु या गंभीर समस्याकडे सर्व स्तरावरून दुर्लक्ष होत आहे