लाचखोर सहायक प्रकल्प अधिकारी अटकेत
By Admin | Updated: July 24, 2015 01:22 IST2015-07-24T01:22:15+5:302015-07-24T01:22:15+5:30
वाशिम येथे एसीबीची कारवाई; सहायक प्रकल्प अधिका-यास ५00 रुपयांची लाच घेताना पकडले.

लाचखोर सहायक प्रकल्प अधिकारी अटकेत
वाशिम : येथील नगरपरिषदेतील सुवर्ण जयंती स्वयंरोजगार योजनेंतर्गत कर्तव्यावर असलेला सहायक प्रकल्प अधिकारी किशोर किसन वानखेडे याला ५00 रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. ही घटना २३ जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली. नगरपरिषद अंतर्गत सुवर्ण जयंती शहरी स्वयंरोजगार योजनेंतर्गत कर्जाचा प्रस्ताव व प्रकल्प अहवालासाठी तक्रारदाराला सहायक प्रकल्प अधिकारी किशोर वानखेडे याने लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने वाशिम येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे एसीबीच्या पथकाने नगरपरिषदेच्या आवारात दुपारच्या सुमारास सापळा रचला. यावेळी सहायक प्रकल्प अधिकारी वानखेडे याने पंचासमोर तक्रारदाराकडून ५00 रुपयांची लाच स्वीकारली. वानखेडे याला लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले.