लाचखोर ग्रामसेवक, शिपाई लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात!
By Admin | Updated: February 18, 2017 03:26 IST2017-02-18T03:26:19+5:302017-02-18T03:26:19+5:30
कारंजा येथील प्रकरण ; नाहरकत प्रमाणपत्रासाठी पैशाची मागणी

लाचखोर ग्रामसेवक, शिपाई लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात!
कारंजा लाड , दि. १७- मंजूर झालेल्या प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्रासाठी आवश्यक असलेले नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी अडीच हजार रुपयांची लाच स्वीकारताना काळी कारंजा येथील शिपाई तथा ग्रामसेवकास लाचलुचपत विभागाने शुक्रवार, १७ फेब्रूवारीला रंगेहात अटक केली. जनऔषधी केंद्रासाठी लागणार्या नाहरकत प्रमाणपत्राकरिता ग्रामसेवक सुरेश गांजरे यांनी ५५0 रुपये टॅक्स भरण्यासोबतच ५ हजार रुपये रकमेची मागणी तक्रारदारास केली. यावर कारवाई करुन लाचलुचपत विभागाच्या पथकाने मंगरुळपीर येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील दोन पंचांना सोबत घेऊन सापळा रचला. यादरम्यान कारंजा येथील एका खासगी कार्यालयात ग्रामसेवक गांजरे याच्या सांगण्यावरून तक्रारदाराने शिपाई गणेश तरासे याच्याकडे २.५ हजार रुपये दिले. यावेळी तेथे दबा धरून असलेल्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने गांजरे आणि तरासे या दोघांनाही जेरबंद करून कारंजा शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. दोन्ही आरोपींविरुद्ध कलम ७,१२,१३(१) (ड) सहकलम १३ (२) लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.