कामरगाव सौर ऊर्जा प्रकल्पात लोकार्पणापूर्वीच बिघाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:26 IST2021-02-05T09:26:21+5:302021-02-05T09:26:21+5:30
कारंजा तालुक्यातील कामरगाव परिसरातील शेतक-यांना सुरळीत वीज पुरवठा व्हावा, या उद्देशाने मागील काही वर्षांपूर्वी कामरगाव येथे ३३ के.व्ही. वीज ...

कामरगाव सौर ऊर्जा प्रकल्पात लोकार्पणापूर्वीच बिघाड
कारंजा तालुक्यातील कामरगाव परिसरातील शेतक-यांना सुरळीत वीज पुरवठा व्हावा, या उद्देशाने मागील काही वर्षांपूर्वी कामरगाव येथे ३३ के.व्ही. वीज विज उपकेंद्राची निर्मिती करण्यात आली. या वीज उपकेंद्रावर जवळपास ४० गावे जोडण्यात आली होती. सुरुवातीची काही वर्षे या उपकेंद्रातून शेतक-यांसह ग्रामस्थांना सुरळीत वीज पुरवठा होत असल्याने समाधान लाभत होते; परंतु कालांतराने वीज ग्राहकांची संख्या वाढू लागली आणि कामरगाव वीज उपकेंद्रावरचा दाब वाढला. त्यामुळे रोहित्रात वारंवार बिघाड होऊन वीज पुरवठा खंडित होणे, कमी-अधिक दाबाचा वीज पुरवठा होणे, त्यामुळे वीज उपकरणे निकामी होण्याचे प्रकार वाढले आणि ग्रामस्थांसह शेतक-यांना या प्रकाराचा अक्षरश: वैताग आला. अखेर ही समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत येथे ५८० किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे ठरले आणि या प्रकल्पाचे कामही संबंधित कंत्राटदार कंपनीने पूर्ण केल्यानंतर २६ जानेवारीला या वीज उपकेंद्राचे लोकार्पण करण्याचे ठरले. त्याची सर्व तयारी झाली असतानाच लोकार्पणाच्या पूर्वसंध्येला या प्रकल्पात तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यामुळे लोकार्पण रखडले आहे.
---------
दुरुस्तीनंतरच होणार लोकार्पण
कामरगाव येथील बहुप्रतीक्षित सौर उर्जा प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर हा प्रकल्प प्रत्यक्ष सुरू होण्याची प्रतीक्षा शेतक-यांसह ग्रामस्थांना लागली होती; परंतु त्यात तांत्रिक बिघाड निर्माण झाला. आता हा तांत्रिक बिघाड दूर करण्याचे काम संबंधित कंत्राटदार कंपनीकडून केले जात असून, दुरुस्ती झाल्यानंतरच हा प्रकल्प जनसेवेत रुजू केला जाणार असल्याची माहिती संबंधित अभियंत्यांनी शनिवारी दिली.
===Photopath===
290121\29wsm_3_29012021_35.jpg
===Caption===
कामरगाव सौर उर्जा प्रकल्पात लोकार्पणापूर्वीच बिघाड