प्राथमिक शिक्षक संघटनांचा बीएलओच्या कामावर बहिष्कार
By Admin | Updated: April 11, 2015 01:43 IST2015-04-11T01:43:27+5:302015-04-11T01:43:27+5:30
मालेगाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना दिली बीएलओची कामे.

प्राथमिक शिक्षक संघटनांचा बीएलओच्या कामावर बहिष्कार
मालेगाव : प्राथमिक शिक्षकांना कोणत्याही प्रकारची अशैक्षणिक कामे देऊ नयेत, असा राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांचा स्पष्ट आदेश असतानाही मालेगाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना बीएलओची कामे दिली गेली आहेत. प्राथमिक शिक्षकांच्या सर्व संघटनांनी निवेदन देऊन या कामावर बहिष्कार टाकला आहे. मालेगाव येथील तहसीलदार, गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना प्राथमिक शिक्षक संघटनांनी दिलेल्या निवेदनात असे नमूद केले की, मालेगाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांकडे देण्यात आलेल्या सचित्र मतदार याद्यांचे काम काढून घ्यावे. शिक्षकांपुढे आता परीक्षा व प्रशिक्षण आहेत. बीएलओच्या कामामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते. केंद्र शासनाच्या आरटीई २00९ नुसार प्राथमिक शिक्षकांकडून निवडणूक व जनगणना याव्यतिरिक्त कोणतेही कामे देण्यात येऊ नये, असा प्राथमिक शिक्षण संचालनालय व मरापूण्र 0१/८१९ प्राशिस/ आरटीई/ यश/कामे ५00/ २0१५ च्या १८ फेब्रुवारी व २ मार्च रोजीच्या आदेशानुसार स्पष्ट आदेश आहे. तरीही ही कामे देण्यात आली आहेत. याच वेळी विद्यार्थ्यांच्या परीक्षा व विविध प्रशिक्षणे आहेत. त्यामुळे ही कामे काढून टाकण्यात यावी, अशी मागणी शिक्षकांनी केली. राष्ट्रवादी शिक्षक संघटना, साने गुरुजी शिक्षक संघटना, अखिल भारतीय शिक्षक संघटना, अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाच्या पदाधिकारी व सदस्यांसह मंचकराव तायडे, नागेश कव्हर, प्रशांत नागूलकर, रउफ बेग, मो. अन्वर, गजानन सोनुने, आर. जी. भगत, दादासाहेब देशमुख, मनोज वाझुळकर यांच्यासह ७0 ते ८0 जणांची उपस्थिती होती.