दारूच्या दुकानांमध्ये बालकांच्या हातात ‘बाटली’
By Admin | Updated: April 24, 2015 01:29 IST2015-04-24T00:58:16+5:302015-04-24T01:29:17+5:30
लोकमत स्ट्रिग ऑपरेशन; बालकांनीच केला पर्दाफाश; विक्रेते बिनधास्त.

दारूच्या दुकानांमध्ये बालकांच्या हातात ‘बाटली’
वाशिम : देशी-विदेशी दारू विक्रेते अल्पवयीन मुलांना दुकानामधून दारूच्या बाटलीची सर्रास विक्री कशी करतात, याचे कारनामे ह्यलोकमतह्णच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये कैद झाले आहेत. ह्यलोकमतह्णच्या स्टिंगमध्ये सहभागी झालेल्या काही बालकांनीच २३ एप्रिल रोजी वाशिम, कारंजा, रिसोड, मंगरुळपीर, मालेगाव शहरांमध्ये या वास्तवाचा पर्दाफाश केला. देशी-विदेशी दारू दुकानांमधून १८ वर्षाखालील अल्पवयीन मुलांना दारू बाटलीची विक्री कदापिही करू नये, असे शासनाचे निर्देश आहेत. या निर्देशांची अंमलबजावणी जिल्हा उत्पादन शुल्क विभागातर्फे वाशिम जिल्ह्यात कितपत होत आहे, याची पडताळणी करण्यासाठी २३ एप्रिल रोजी जिल्ह्यातील सहाही शहरांमधील काही देशी-विदेशी दारू दुकानांमध्ये स्टिंग ऑपरेशन करण्यात आले. दारू दुकानांमध्ये कोणतीही चौकशी न करता, मागणी केल्यानुसार मुलांना हवी ती दारूची बाटली बिनधास्त दिली जात असल्याची बाब स्टिंगने चव्हाट्यावर आणली. ज्या वयात भविष्याचा पाया रचायचा, अभ्यास करून मोठ्ठं होण्याची स्वप्नं रंगवायची, त्या वयात काही बालकांचे पाय लडखडू लागतात. नशेचा राक्षस बालकांना कवेत घेऊन त्यांच्या स्वप्नांचे इमले उद्ध्वस्त करू पाहत आहे. यावरही कळस म्हणजे पैशांच्या हव्यासापुढे नशेचे व्यापारी बालकांच्या हाती मागेल ती बाटली ठेवत आहेत. यामुळे बालकांचे व्यसन वाढण्याला एकप्रकारे चालनाच मिळत असल्याचे दिसून येते. वाशिम शहरातील तीन दुकानांमध्ये १३ ते १५ वर्षे वयोगटातील काही बालकांना दारू बाटलीची खरेदी करण्यासाठी पाठविण्यात आले होते. यावेळी एका विक्रेत्याने दारू बाटली देण्यास नम्रपणे नकार दिला तर दोन विक्रेत्यांनी कोणतीही विचारपूस न करता, पैसे घेऊन हवी ती बाटली बालकांच्या हाती टेकवली. बाटली दिल्यानंतर येथून लवकर जा, असा सल्ला देण्यास मात्र सदर विक्रेते विसरले नाहीत, हे विशेष.