निराधार योजनेतील बोगस लाभार्थी प्रशासनाच्या रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:22 IST2021-02-05T09:22:17+5:302021-02-05T09:22:17+5:30
वयोवृद्ध, परितक्त्या, निराधार, विधवा, श्रावणबाळ योजना, आशा, दारिद्र्यरेषेखालील आणि २१ हजार रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न असलेल्या खऱ्या लाभार्थ्यांसाठी या योजना ...

निराधार योजनेतील बोगस लाभार्थी प्रशासनाच्या रडारवर
वयोवृद्ध, परितक्त्या, निराधार, विधवा, श्रावणबाळ योजना, आशा, दारिद्र्यरेषेखालील आणि २१ हजार रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न असलेल्या खऱ्या लाभार्थ्यांसाठी या योजना असताना अनेक दलालांनी महसूल विभागातील काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून खोट्या दस्तऐवजांच्या आधारे बोगस लाभार्थ्यांना निराधार योजनेतील लाभ मिळवून दिला आहे. ग्रामीण भागातील अनेक सधन कुटुंबांतील व्यक्ती ज्यांच्याकडे मुबलक जमिनी असताना जाणीवपूर्वक जमिनीचे खातेफोड करून निराधार योजनांचा लाभ घेतला जात आहे. पूर्वी एकत्र कुटुंबातील शासकीय नोकरीत असलेल्या कुटुंबातीलसुद्धा काही व्यक्तींनी आपली शिधापत्रिका वेगळी करीत या योजनेचा लाभ घेतल्याची चर्चा आहे. सदर योजना या गरजवंतांसाठी असताना धनदांडग्या कुटुंबांतील व्यक्तीच या योजनांचे लाभ घेत आहेत. निराधार योजनेतील शेकडो बोगस लाभार्थ्यांकडून हजार - दोन हजारांमध्ये मासिक मानधनाची दलाल हमी देत खऱ्या लाभार्थ्यांना शासनाच्या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवत आहेत. यासंदर्भात महसूल विभागाने कसून तपास करीत योग्य लाभार्थ्यांना न्याय देण्याची मागणी होत आहे. सदर चौकशीदरम्यान शासनाने लाभार्थ्यांच्या अपत्यांची संपूर्ण माहिती घेत तपासणी केल्यास नक्कीच बोगस लाभार्थ्यांसह दलालांचे पितळ उघडे पडेल.
.......................
निराधार योजनेतील लाभार्थ्यांचा अहवाल मागितला आहे. लवकरच लाभार्थ्यांचा अहवाल प्रशासनाकडे पाठविण्यात येईल.
- रवींद्र खंदारे, तलाठी, भर जहागीर