बोगस डॉक्टरांचा आरोग्याशी ‘खेळ’
By Admin | Updated: August 10, 2014 22:31 IST2014-08-10T22:31:01+5:302014-08-10T22:31:01+5:30
भोळय़ा भाबड्या ग्रामीण जनतेच्या आरोग्याशी अनेक बोगस डॉक्टरांनी खेळ मांडला आहे.

बोगस डॉक्टरांचा आरोग्याशी ‘खेळ’
वाशिम : कोणतीही वैद्यकीय पदवी व पदविका नसताना अल्पशा अनुभवावर वैद्यकीय व्यवसाय करुन भोळय़ा भाबड्या ग्रामीण जनतेच्या आरोग्याशी अनेक बोगस डॉक्टरांनी खेळ मांडला आहे. वाशिम तालुक्यात तसेच शहरात अनेक बोगस डॉक्टर असून याकडे आरोग्य विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. काही दिवस एखाद्या डॉक्टरकडे मदतनीस किंवा कंपाउंडर म्हणून काम करुन किंवा एखाद्या डॉक्टरच्या हाताखाली नोकरी करताना पेशंटला सलाईन लावणे, ताप मोजणे, सुई लावणे हे सर्व कामे शिकून नंतर हेच कंपाऊंडर ग्रामीण भागात डॉक्टरकी करीत असल्याचे चित्र आहे. डॉक्टर म्हणून स्वत:च्या घरात किंवा कुठेतरी भाड्याने खेड्यात किंवा शहराच्या शेवटच्या टोकावर दवाखाना टाकायचा आणि नंतर गोरखधंदा सुरू ठेवायचा, असे उद्योग वाशिम तालुक्यात सुरू आहेत. बोगस डॉक्टरांच्या दवाखान्यावर केवळ ह्यदवाखानाह्ण असे लिहिलेले बोर्ड लावण्यात येतात. त्यावर रजिस्ट्रेशन नंबर, पदवी व कुणाचेही नाव नसते. ग्रामीण भागातील भोळी,भाबडी जनता या बोगस डॉक्टरांच्या गळाला लागतात. कुठल्याही मेडिकल कॉलेजमधून पदवी किंवा शिक्षण न घेता हे कंपाउंडर हातात सुटकेस घेवून डॉक्टर म्हणून मिरवतात. सध्यस्थितीत वाशिम तालुक्यातील ग्रामीण भागात तसेच शहरामध्ये लाखाळा व काळे फाईल परिसरात बोगस डॉक्टर कार्यरत आहेत. जिल्हय़ातील ग्रामीण भागात पाहिजे तशा प्रमाणात सरकारी रुग्णसेवा मिळत नसल्याने हय़ाचा फायदा बोगस डॉक्टर घेत आहे. बोगस डॉक्टरांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हय़ाच्या ठिकाणी कोणतीही प्रभावी यंत्रणा कार्यरत नसल्याचा आरोप होत आहे. याबाबत जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला असता, नागरिकांनी बोगस डॉक्टरबाबत तक्रारी करावी. तक्रार प्राप्त झाल्यानंतर कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले.