शिरपूरच्या बेपत्ता युवकाचा मृतदेह विहिरीत आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2022 17:48 IST2022-01-16T17:48:32+5:302022-01-16T17:48:38+5:30
The body of a missing youth found in a well : श्रीकांत गोरे याचा हिस्सा असलेल्या शेतातील विहिरीमध्ये चेतन उर्फ मुरलीधर याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.

शिरपूरच्या बेपत्ता युवकाचा मृतदेह विहिरीत आढळला
शिरपूर ( वाशिम ) : शुक्रवार (दि.१४) रात्री ८ वाजतापासून बेपत्ता असलेल्या शिरपूर येथील मुरलीधर ऊर्फ चेतन धोंडुलाल मुंदडा (२२) या युवकाचा मृतदेह १६ जानेवारीला सकाळच्या दरम्यान गावानजीकच्या एका विहिरीमध्ये तरंगताना आढळून आला. मृतकाच्या डोक्यावर व चेहऱ्यावर खोल जखमा आढळून आल्याने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली.
शिरपूर जैन येथील मुरलीधर धोंडूलाल मुंदडा व श्रीकांत महादेव गोरे हे दोघे मित्र १४ जानेवारी रोजी एम.एच. ३७ सी ९७८१ या दुचाकीवर घरून निघून गेले होते. दोघेही घरी परत न आल्यामुळे दोघांच्याही पालकांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कुठेही शोध लागला नाही. शिरपूर पोलीस स्टेशनला याविषयी माहिती दिली. पोलिसांनी काढलेल्या सीडीआर वरून दोघांपैकी एकाचा मोबाईल कोथरूड पुणे येथील शेवटचे लोकेशन दाखवीत होता. काही जण कोथरुड पुणे येथे तात्काळ रवाना झाले. मात्र १६ जानेवारी सकाळी श्रीकांत गोरे याचा हिस्सा असलेल्या शेतातील विहिरीमध्ये चेतन उर्फ मुरलीधर याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. घटनास्थळावर मोठी गर्दी झाली. पोलीस निरीक्षक सुनील वानखेडे, साहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बांगर, पोलीस कर्मचारी मनोज काकडे हे तात्काळ घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी गावकरी व शेतकऱ्याच्या साह्याने मृतदेह विहिरीतून बाहेर काढुन पंचनामा केला. मृतकाच्या डोक्याला गंभीर इजा दिसून आली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविला. हा प्रकार घातपाताचा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र तूर्तास घातपात की दुर्घटना या चर्चेला उधाण आले आहे. मृतकासोबत असलेला श्रीकांत गोरे अचानक कोथरूड पुणे येथे कसा काय गेला? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याविषयी लवकरच तपास करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक वानखडे यांनी दिली.
अडीअडचणीत चेतनची श्रीकांतला मदत
मृतकाचे काका कचरुलाल मुंदडा यांनी शिरपूर पोलिसांत फिर्याद दिली कि, मृतक मुरलीधर ऊर्फ चेतन मुंदडा व त्याचा मित्र श्रीकांत महादेव गोरे हे १२ वीपर्यंत सोबत शिकले असून चेतन हा श्रीकांतला अडीअडचणीत मदत करीत होता. चेतनचे श्रीकांतकडे हात उसने दिलेले १० हजार रुपये घेणे बाकी होते. या तक्रारीनुसार शिरपूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.