वाशिम जिल्ह्यात भाजपाचा ‘डंका’

By Admin | Updated: October 20, 2014 01:05 IST2014-10-20T01:05:36+5:302014-10-20T01:05:36+5:30

तीन पैकी तब्बल दोन मतदारसंघात भाजपचे कमळ फुलले.

BJP's 'Danka' in Washim district | वाशिम जिल्ह्यात भाजपाचा ‘डंका’

वाशिम जिल्ह्यात भाजपाचा ‘डंका’

वाशिम : शिवसेनेशी झालेला काडीमोल, एकवटलेले विरोधक आणि विस्कटलेली सामाजिक समीकरणांची घडी आदींवर मात करीत भारतीय जनता पक्षाला जिल्ह्यात आपला डंका वाजविण्यात यश आले. जिल्ह्यातील तीन पैकी तब्बल दोन मतदारसंघात भाजपचे कमळ फुलले असून, वाशिममध्ये विद्यमान आमदार लखन मलिक तर कारंजात राजेंद्र पाटणी विजयी झाले. रिसोड या एकमेव मतदारसंघात मात्र कॉग्रेस विजयाला गवसणी घालू शकली.येथे विद्यमान आमदार अमित झनक यांनी येथे आपला करिष्मा पुन्हा एकदा दाखवून दिला आहे. गत १५ ऑक्टोबरला जिल्ह्यातील वाशिम, कारंजा व रिसोड मतदारसंघात विधानसभेची निवडणूक पार पडली होती. शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या युतीमधील घटस्फोट, काँग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसच्या आघाडीत झालेली बिघाडी, भारिप-बहुजन महासंघाने राबविलेला सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इंजिनाने पकडलेला वेग आदींमुळे तिन्ही मतदारसंघात ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. त्यातच कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरीमुळे चुरस अधिकच वाढल्याचे दिसून येत होते. परिणामी, निकालांचे आडाखे बांधण्यात मतदार, कार्यकर्ते, तथा राजकीय जाणकारांसह सट्टेबाजारही गोंधळात पडला होता; मात्र १९ ऑक्टोबरला जाहीर झालेल्या निकालाने सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला. वाशिम मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार लखन मलिक यांनी पुन्हा एकदा विजयाला गवसणी घातली. शिवसेनेच्या शशिकांत पेंढारकर यांनी त्यांना तुल्यबळ लढत दिली असली तरी, शेवटच्या काही फेर्‍यांमध्ये मलिक यांचे मताधिक्य कमी करणे त्यांना शक्य झाले नाही. मलिक यांना ४८ हजार १९६ तर दुसर्‍या क्रमांकावर राहिलेल्या पेंढारकर यांना ४३ हजार ८0३ मते मिळाली. कारंजा मतदारसंघातील निवडणूक यावेळी लक्षवेधी ठरली. भारतीय जनता पक्षाने येथे शिवसेनेचे माजी आमदार राजेंद्र पाटणी यांना रिंगणात उतरिवले होते. तर भारिप-बहुजन महासंघाने सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग करीत युसूफ पुंजानी यांना उमेदवारी दिली होती. मुस्लिम व दलित व्होटबँकेमुळे पुंजानी यांनी शेवटच्या क्षणापर्यंंत कडवी झुंज दिली; मात्र विकासाचे व्हिजन मोदींची लाट व राष्ट्रवादीमधील बंडखोरीमुळे येथे भाजपच्या राजेंद्र पाटणींचा विजय झाला. पाटणींनी येथून ४४ हजार ७५१ मते घेतली. तर पुंजाणी यांना ४0 हजार ६0४ मतांवर समाधान मानावे लागले. रिसोड मतदारसंघात यावेळीही कॉग्रेसचे अमित झनक व भाजपचे विजय जाधव यांच्यातच सामना झाला. जाधव यांच्या कडव्या आव्हानाला झनक यांनी एकहाती पेलुन येथे कॉग्रेसला विजयाच्या गावापर्यंंत पोहोचविले. येथे झनक यांना ७0 हजार ९३९ तर जाधवांना ५४ हजार २३१ मते मिळाली. गत एप्रिल महिन्यात झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणूकीतही येथे झनकांनी जाधव यांना चित केले होते.

Web Title: BJP's 'Danka' in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.