बिबखेड - मालेगाव नाका रस्त्याची वाट ; चालक त्रस्त !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:44 IST2021-08-27T04:44:42+5:302021-08-27T04:44:42+5:30
वाशिम : जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते तसेच काही मुख्य रस्त्यांची वाट लागल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. रिसोड ते मालेगाव या ...

बिबखेड - मालेगाव नाका रस्त्याची वाट ; चालक त्रस्त !
वाशिम : जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते तसेच काही मुख्य रस्त्यांची वाट लागल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. रिसोड ते मालेगाव या मार्गावरील बिबखेड ते मालेगाव नाका या दरम्यान खड्डे चुकविण्याच्या नादात अपघाताची शक्यता नाकारत नाही.
सुलभ दळणवळणासाठी सुरक्षित व मजबूत रस्ते असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील काही प्रमुख रस्ते आणि ग्रामीण भागातील रस्ते खड्डेमय झाल्याने याचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. रिसोड ते मालेगाव या मार्गावरील बिबखेड ते मालेगाव नाका या दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनाचा वेग नियंत्रित करावा लागतो तसेच समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू द्यावी कशी ? असा प्रश्न चालकांना पडतो. या मार्गावरील खड्ड्यांची डागडुजी करावी, अशी मागणी वारंवार करण्यात आली. परंतु , अद्याप खड्डे बुजविण्यात आले नसल्याने वाहन चालविताना चालकांची दमछाक होत आहे. पाऊस पडल्यानंतर खड्ड्यात पाणी साचत असल्याने खड्ड्याच्या खोलीचा अंदाजही नवीन चालकांना येत नाही. त्यामुळे खड्ड्यातून वाहन काढताना चालकाला विशेष दक्षता घेण्याशिवाय पर्याय नाही.
०००००००
अडोळी रस्त्याची चाळण
वाशिम तालुक्यातील पाच मैल फाट्यापासून अडोळी, खंडाळा मार्गे टो, जुमडाकडे जाणाऱ्या रस्त्याची चाळण झाली आहे. खड्डे चुकविताना वाहनचालकांच्या नाकीनऊ येत आहे. या रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी वारंवार करण्यात आली. परंतु , याकडे लक्ष देण्यात आले नाही.
०००००००
व्याड- चिखली रस्ता खड्डेमय !
रिसोड तालुक्यातील व्याड-चिखली हा रस्ता खड्डेमय झाला आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूने खड्डे पडले असल्याने वाहन चालविताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. चार किमी अंतरासाठी २० ते २५ मिनिटाचा वेळ लागत आहे. या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन ही देण्यात आले. मात्र, रस्ता दुरूस्ती झाली नाही.
००००००००
नागरिक म्हणतात... रस्ते दुरूस्ती लवकर व्हावी !
कोट
बिबखेड फाटा नजीकच्या रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनचालकांना गैरसोयीला सामोरे जावे लागते. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होऊ नये म्हणून खड्डे लवकरात लवकर बुजविण्यात यावे.
- सुभाष खरात, पळसखेड
०००००
मालेगाव नाका, बिबखेड या रस्त्यावर खड्डे असल्याने वाहन चालविताना गैरसोय होते. व्यवसायानिमित्त दररोज रिसोडला जावे लागते. संभाव्य अनर्थ टाळण्यासाठी रस्ता दुरूस्ती आवश्यक आहे.
- प्रकाश आटोळे, व्यापारी