वाशिम: शिक्षण विभागाच्या शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने येत्या ४ ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील सुमारे १०३१ हजार शाळांची घंटा वाजणार आहे. या शाळातील इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष भरणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ज्ञानाची दारे उघडण्याचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी होकार दिला आहे. मात्र, कोरोना नियमांचे पालन बंधनकारक आहे. सध्या ग्रामीण भागात माध्यमिकच्या सुमारे २०० शाळा सुरू आहेत. तथापि, शहरी भागांतील सर्वच माध्यमाच्या शाळा बंद आहेत. आता शासनाने शहरात पाचवी ते बारावी, तर ग्रामीणमध्ये पाचवी ते बारावीपर्यंत नियमांचे पालन करून शाळा सुरू होतील, असे स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात प्राथमिक, माध्यमिकच्या १३८१ शाळा असून, त्यापैकी ३५० शाळा या पहिली ते चौथीपर्यंतच्या आहेत.
००००००००००
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
शासनाच्या शाळा सुरू करण्याबाबतच्या निर्णयानुसार जिल्हास्तरावर ही कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली असून, या समितीच्या बैठकीचे आयोजन करून त्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागांतील पाचवी ते सातवीच्या शाळांसह शहरी भागांत
पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात येतील.
०००००००००००००
शिक्षकांच्या लसीकरणाची पडताळणी
शासनाच्या निर्णयानुसार सर्व शाळा सुरू करण्यासाठी कोरोना नियमानुसार शिक्षकांचे लसीकरण पूर्ण करणे अनिवार्य आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच शिक्षकांचे लसीकरण पूर्ण झाले असले तरी नेमकी स्थिती काय आहे, किती शिक्षकांचे लसीकरण झाले. किती शिक्षकांनी दोन्ही डोस घेतले, त्याची पडताळणी प्रशासनाकडून केली जाणार आहे.
०००००००००००००००
कोट: शहरी भागात हल्ली शाळा सुरू होण्याचे प्रमाण शून्य होते. मात्र, शासनाने ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने त्या दिशेने तयारी सुरू आहे. त्यामुळे पालकांची अनेक दिवसांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे. आतापर्यंत ग्रामीण भागातील शाळांमध्ये ८ ते १२ वर्ग सुरू होते.
- गजाननराव डाबेराव,
प्रभारी उपशिक्षणाधिकारी, प्राथमिक
००००००००००००००
जिल्ह्यातील एकूण शाळा
पंचायत समिती - शहरी शाळा - ग्रामीण शाळा - एकूण शाळा
कारंजा लाड - ५९ - १६१ - २२०
मालेगाव - १३ - १३८ - १५१
मंगरुळपीर - ३४ - ११० - १४४
रिसोड - ३४ - ११९ - १५३
मानोरा - ०० - १३५ - १३५
वाशिम - ८२ - १६९ - २५१