पर्यायी पीक पद्धतीचा जागर व्हावा!
By Admin | Updated: April 14, 2017 00:55 IST2017-04-14T00:55:17+5:302017-04-14T00:55:17+5:30
वाशिम- पिकांच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करा, पर्यायी पीक पद्धतीचा जिल्हाभरात जागर करा, अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी दिल्या.

पर्यायी पीक पद्धतीचा जागर व्हावा!
पालकमंत्री राठोड यांच्या प्रशासनाला सूचना : खरीप हंगाम पूर्वतयारीचा घेतला आढावा
वाशिम : खरीप हंगामात सोयाबीन पेरणीवर शेतकऱ्यांचा सर्वाधिक भर असतो. त्यामुळे सोयाबीन उत्पादनात वाढ झाली; मात्र दरात यंदा मोठी घसरण झाली आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. ही बाब लक्षात घेता आगामी खरीप हंगामात सोयाबीनला पर्याय ठरू शकेल, अशा पिकांच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करा, पर्यायी पीक पद्धतीचा जिल्हाभरात जागर करा, अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य सभागृहात गुरुवारी आयोजित खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, खासदार भावना गवळी, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती विश्वनाथ सानप, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. खरीप हंगामाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या तयारीविषयी माहितीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी सादरीकरण केले. पालकमंत्री राठोड पुढे म्हणाले, सोयाबीनला पर्याय ठरू शकणाऱ्या पिकांविषयी कृषी विभागाने सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. या पिकांमुळे शेतकऱ्यांना काय फायदा होईल, ते समजावून सांगून त्यांना सदर पिकाची पेरणी करण्यासाठी प्रोत्साहित करावे.
खरीप हंगामात पेरणीसाठी पुरेशा प्रमाणात बियाणे व खते उपलब्ध होण्यासाठी परिपूर्ण नियोजन करावे. तसेच यादरम्यान बोगस बियाणे, खते विक्रीस येण्याची शक्यता असते. त्यामुळे बोगस बियाणे, खत विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथक स्थापन करून त्यांचे संपर्क क्रमांक जाहीर करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना मशागत व पेरणीसाठी पैसा उपलब्ध होण्यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप लवकरात लवकर करण्यात यावे. गतवर्षी ज्या बँकांचे पीक कर्ज वितरण कमी आहे, अशा बँकांनी यावर्षी पीक कर्ज मेळावे आयोजित करून कर्ज वितरण वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना पालकमंत्री राठोड यांनी दिल्या.
रिसोड येथील अलाहबाद बँकेकडे पीक विम्याच्या प्रलंबित असलेल्या प्रकरणाबद्दल तातडीने कार्यवाही करून शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
जिल्ह्यातील प्रलंबित कृषीपंप वीज जोडण्या तातडीने देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. धडक सिंचन योजनेतून पूर्ण झालेल्या विहिरींना प्राधान्याने वीज जोडणी देण्यासाठी महावितरणने आवश्यक कार्यवाही करावी, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या मृदा आरोग्यपत्रिका, जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, राष्ट्रीय कृषी विकास योजना आदी योजनांमधील कामांचे सादरीकरण यावेळी गावसाने यांनी केले.
पाच हजार हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट ठेवा!
फळबाग लागवडीच्या माध्यमातून कमी पाणी व कमी खर्चात अधिक उत्पन्न घेता येणे शक्य आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळबाग लागवडीकडे वळविण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत. याकरिता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून सन २०१७-१८ मध्ये जिल्ह्यातील किमान पाच हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवून त्यानुसार नियोजन व कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी दिल्या.
पीक लागवडविषयीच्या घडीपुस्तिकेचे विमोचन
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) ने तयार केलेल्या उत्पादन खर्च कमी करण्याच्या सर्वसाधारण उपाययोजना व पीकनिहाय लागवड तंत्रज्ञान याविषयी माहितीचा समावेश असलेल्या घडीपुस्तिकेचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. या घडीपुस्तिकेत सोयाबीन, तूर, कापूस आदी पिकांच्या लागवडविषयक तंत्रज्ञानाचा समावेश आहे.