‘एटीएम’सह बँकांमध्ये ‘कॅश’चा तुटवडा!

By Admin | Updated: April 13, 2017 02:12 IST2017-04-13T02:12:25+5:302017-04-13T02:12:25+5:30

दैनंदिन व्यवहारांवर परिणाम : सर्वच बँकांचे ‘आॅल टाइम मनी’ धोरण ठरतेय कुचकामी

Bank 'cash' with 'ATM'! | ‘एटीएम’सह बँकांमध्ये ‘कॅश’चा तुटवडा!

‘एटीएम’सह बँकांमध्ये ‘कॅश’चा तुटवडा!

वाशिम : जिल्ह्यातील सर्वच ठिकाणचे एटीएम रिकामे झाले असून, बँकांमध्येही ‘कॅश’चा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे रोखीने चालणाऱ्या दैनंदिन व्यवहारांवर विपरित परिणाम होत असून, या समस्येपुढे बँक प्रशासनही हतबल झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी चलनातून ५०० आणि हजारच्या नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे पुढचे तब्बल अडीच ते तीन महिने बाजारपेठेतील सर्व व्यवहार विस्कळित झाले होते. बँकांमध्ये ठराविक रकमांचाच ‘विड्रॉल’ मिळत होता. तसेच एटीएममध्येही कॅश मिळणे दुरापास्त झाले होते. ही परिस्थिती नियंत्रणात येत असतानाच पुन्हा एकवेळ चलन तुटवड्याचा प्रश्न गंभीर झाला असून, नागरिक त्रस्त झाले आहेत.
नोटाबंदीमुळे जेवढी कॅश बँकांमध्ये भरल्या गेली, तेवढ्या कॅशच्या बदल्यात ‘आरबीआय’ने नव्याने २ हजार आणि ५०० रुपयांच्या नोटा बँकांना उपलब्ध करून दिल्या; मात्र त्यापैकी बहुतांश ‘कॅश’ पुन्हा चुकीच्या पद्धतीने चलनातून गायब झाल्यानेच हा प्रश्न उद्भवल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, आरबीआयकडून सद्य:स्थितीत सर्वच बँकांना व्यवहारासाठी पुरेसा पैसा मिळेनासा झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश सर्वच बँकांच्या एटीएममध्ये ठणठणाट आहे. जिल्ह्यात वाशिम, मंगरूळपीर, कारंजा आणि रिसोड येथे ‘करन्सी चेस्ट’ची सुविधा असून, स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, बँक आॅफ इंडियासह इतर बँकांचे ६२ एटीएम आहेत; परंतु पुरेशी रक्कम नसल्यामुळे बहुतांश एटीएम बंद राहत आहेत. त्यामुळे नागरिकांना आपल्या बँकेच्या खात्यातून पैसेच विड्रॉल करता येऊ नये, याची खबरदारी घेतल्या गेल्याचे चित्र जिल्हाभरात दिसून येत आहे.
तथापि, दैनंदिन व्यवहारांकरिता सर्वच एटीएमसह बँकेतून कॅश मिळणे दुरापास्त झाल्यामुळे जिल्ह्यातील वाशिम, मंगरूळपीर, कारंजा, रिसोड, मालेगाव तथा मानोरा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले असून उद्भवलेला प्रश्न तत्काळ निकाली निघावा, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

शिरपूर येथील बँक आॅफ महाराष्ट्रचे ‘एटीएम’ नोटाबंदीनंतर पाच महिन्यांपासून बंदच!
जिल्ह्यातील शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथे बँक आॅफ महाराष्ट्रचे ‘एटीएम’ असून ८ नोव्हेंबरला झालेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर ते आजतागायत बंदच आहे. याशिवाय जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एटीएममध्येही नियमित कॅश राहत नाही. यामुळे शिरपूरसह नजिकच्या गावांमधील सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना तालुकास्थळी अर्थात मालेगावला यावे लागत आहे; मात्र मालेगावमधील एटीएमही गेल्या अनेक दिवसांपासून बंदच राहत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे नागरिकांनी त्यांच्याकडे असलेल्या ५०० व हजारच्या नोटा बँकेत जमा केल्या, तेवढ्या नोटांची ‘आरबीआय’ने छपाई करून बँकांना वितरित केल्या; मात्र विड्रॉलच्या तुलनेत बँकांमध्ये डिपॉझिटचे प्रमाण अगदीच कमी असल्यामुळे चलन तुटवड्याचा प्रश्न पुन्हा एकवेळ निर्माण झाला आहे. सोबतच एटीएमही बंद राहत आहेत. उद्भवलेली समस्या दूर करण्यासाठी नागरिकांनी पैसा चलनात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
- व्ही.एच.नगराळे, जिल्हा व्यवस्थापक, अग्रणी बँक

Web Title: Bank 'cash' with 'ATM'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.