दुपटीचा मोह टाळा

By Admin | Updated: August 10, 2014 00:13 IST2014-08-10T00:13:21+5:302014-08-10T00:13:21+5:30

गुंतवणूकदारांनो सावधान : केबीसीमध्ये अडकले कोट्यवधी रुपये

Avoid duplication | दुपटीचा मोह टाळा

दुपटीचा मोह टाळा

बुलडाणा : गेल्या काही वर्षात जिल्ह्यातील गुंतवणूक क्षेत्रात कमालीची धास्ती व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डबघाईस आलेल्या जिल्हा बँकेमुळे नागरिकांच्या कोट्यवधीच्या ठेवी अडकल्या असून, आता केबीसी व पीएसपीएस कंपनीने लोकांना कोट्यवधींनी गंडविले आहे. अशा कंपन्या देत असलेल्या योजनांमध्ये जास्त परतावा आणि जोखीम या दोन्ही बाबी एकत्न असतात. जास्त जोखिमेच्या योजना फसव्या असतात. उद्या रडत बसण्याऐवजी आजच आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आयुष्याची ठेव सांभाळा, व ह्यडबलह्णचा मोह टाळा, असा मोलाचा सल्ला आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना दिला आहे. शेअर बाजार आणि राष्ट्रीयीकृत बँका जास्त परतावा देत नाहीत, मग फसव्या कंपन्या वार्षिक ६0 टक्क्यांपर्यंत व्याज कसे देतात, त्या कुठे गुंतवणूक करतात, कंपनीची माहिती याचा इत्थंभूत विचार लोकांनी करावा. गुंतवणूकदारांना आकर्षित करणारे व्याजदर, माऊथ पब्लिसिटीचा आधार आणि त्याला मिळणारी कमिशन एजंटांची साथ, त्यामुळे गुंतवणूकदारांची फसवणूक होते. केबीसीनंतर आता पीएसपीएस या कंपनीचा आर्थिक घोटाळा सध्या चर्चेचा विषय आहे. सुरक्षित रकमेतून जास्त व्याजाची अपेक्षा आणि झटपट श्रीमंत होण्याची मानसिकता, याचा फायदा फसव्या कंपन्या घेतात. काही सहकारी बँका, संस्था, पतसंस्था, गैरबँकिंग कंपन्या नियमाची पायमल्ली करून जास्त व्याज देतात. तिथेच गुंतवणूकदार फसतात. अखेर पोलिस तक्रार आणि न्यायालयीन लढाईशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नसतो. आयुष्याची कमाई कुठे गुंतवावी, यावर तज्ज्ञांनी लोकमतशी बोलताना गुंतवणूकदारांना मोलाचा सल्ला दिला.

** एजंटवरही कारवाई व्हावी देऊळगावराजा : राज्यभरात घोटाळ्यांनी गाजत असलेल्या केबीसी, पीएसपीएस कंपन्यामध्ये संचालकांपासून ते एजंटापर्यंत सर्व जण दोषी आहेत. यामध्ये राज्यभरात पोलिस कारवाई सुरू असून लातूरमध्ये केबीसीच्या चार एजंटवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बुलडाणा जिल्ह्यात मात्र एजंटवर कारवाई करण्यात आलेली नाही. कंपनीचे हस्तक असलेल्या असे एजंट आजही राजरोसपण फिरताना दिसून येतात. पीएसपीएस या कंपनीच्या विरोधात दे.राजा पो.स्टे.ला दाखल झालेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी परभणी पोलिसांच्या ताब्यात असलेले कंपनीच्या म्होरक्या रवींद्र भागोराव डांगे, अशोक प्रभाकर गायकवाड यांना कोर्टाने दे. राजा पोलिसांकडे सोपवले आहे. सोमवार ११ ऑगस्टपर्यंत हे दोन आरोपी पोलिस कोठडीत आहेत. ज्या गुन्ह्यात हे दोन आरोपी आहेत तो गुन्हा या कंपनीचा एजंट समाधान दामोधर मोरे रा.दे. राजा यांच्यावर दाखल असून, सध्या मोरे अटकपूर्व जामिनावर बाहेर आहे. आतापर्यंत दे. राजा तालुक्यातून सहा कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचे पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे या परिसरातील आणखी एजंटवर पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे. पीएसपीएसच्या ज्या गुंतवणुकदारांनी मूळ धनादेश व सत्यप्रती दिल्या त्या एजंटांवरसुद्धा पोलिसांनी कारवाई करणे गरजचे आहे. पो.स्टे.मध्ये तक्रारी घेऊन येणार्‍या गुंतवणूकदारांना धनादेश व सत्यप्रतीचीच मागणी केली जाते. लोकांकडे दुय्यम प्रती आहेत. त्या स्वीकारल्या जात नाही. हा सर्व प्रकार एजंटांना वाचविण्यासाठी होत असल्याची चर्चा ही गुंतवणूकदारांमध्ये आहे. लातूर पोलिसांनी अशा एजंटावर गुन्हे दाखल करून कारवाई केलेली आहे त्याचप्रमाणे देऊळगावराजा मध्येही कारवाई होण्याची गरज व्यक्त होत आहे.

Web Title: Avoid duplication

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.