‘ऑडिट’ची धास्ती; सुटीतही कार्यालये सुरू
By Admin | Updated: January 25, 2016 02:12 IST2016-01-25T02:12:14+5:302016-01-25T02:12:14+5:30
आयुक्त कार्यालयाच्या पथकाद्वारे ‘ऑडिट’ सुरू; साफसफाईसह विविध कामे युद्धपातळीवर.

‘ऑडिट’ची धास्ती; सुटीतही कार्यालये सुरू
संतोष वानखडे / वाशिम: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (ग्रामीण) कारभाराची चिरफाड करणारी पंचायत राज कमिटी (पीआरसी) वाशिम जिल्हय़ाच्या तपासणीवर लवकरच येणार आहे. दरम्यान, २७ जानेवारीपासून आयुक्त कार्यालयाचे पथक ह्यऑडिटह्णसाठी जिल्हा परिषदेत दाखल होणार आहे. तपासणीदरम्यान काही गंभीर त्रुट्या निदर्शनात येऊ नये याची दखल म्हणून जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासन कामाला लागले असून, शनिवार व रविवार या दोन दिवशी सुटी असतानाही बहुतांश कार्यालये सुरू होती. ग्रामीण भागात विकासाची गंगा पोचविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (ग्रामीण) ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद या तीन घटकांची निर्मिती करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थेचा कारभार भरकटू नये म्हणून तपासणी व ऑडिट करण्यासाठी पंचायत राज कमिटी (पीआरसी) गठित करण्यात आली. शासनाने नियुक्त केलेली पीआरसी पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या कार्यालयांना भेटी देऊन कामकाजाचे ऑन दी स्पॉट ऑपरेशन करते. पंचायत राज समितीत उच्चपदस्थ अधिकारी व राज्य विधिमंडळाचे लोकप्रतिनिधी अशा २५ जणांचा समावेश असून, गत आठवड्यात बुलडाणा जिल्हय़ाच्या दौर्यावर सदर पथक होते. बुलडाणानंतर उस्मानाबाद जिल्हय़ात सदर पथक गेले असून, त्यानंतर विदर्भातील काही जिल्हय़ांचा नंबर लागण्याची शक्यता आहे. पीआरसी येण्यापूर्वी जिल्हा परिषद प्रशासनातर्फे महत्त्वाचे मुद्दे, विषय आणि ऑडिट या तीन प्रमुख बाबी मंत्रालयाकडे पाठविल्या जातात. तेथे छाननी झाल्यानंतर पीआरसीचा दौरा कधीही निश्चित होऊ शकतो. वाशिम जिल्हा परिषदेतर्फे महत्त्वाचे मुद्दे, विषय व ऑडिट मंत्रालयाकडे पाठविण्याची बाब अंतिम टप्प्यात असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. यानंतर पीआरसीचा ताफा वाशिम जिल्हय़ात कधीही येऊ शकतो. पीआरसी आणि आयुक्त कार्यालयाच्या ऑडिट पथकाची धास्ती घेऊन सुटीच्या दिवसातही स्थानिक स्वराज्य संस्थेची (ग्रामीण) अनेक कार्यालये कामकाजात व्यस्त असल्याचे दिसून येते.