दारुबंदीसाठी संघटना सरसावल्या!
By Admin | Updated: December 17, 2015 02:33 IST2015-12-17T02:33:59+5:302015-12-17T02:33:59+5:30
दारू जिल्ह्यातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिका-यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा.

दारुबंदीसाठी संघटना सरसावल्या!
वाशिम : भांडण, कलहाला कारणीभूत असणारी दारू जिल्ह्यातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकार्यांनी बुधवारी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांच्याशी चर्चा केली. यापूर्वी महिला मंडळ, भारतीय जैन संघटना, बौद्ध युवा मंच आदींनी दारूबंदीची मागणी केली होती.
जिल्ह्यात अवैध दारूविक्रीने कळस गाठला आहे. देशी, विदेशी तसेच गावठी दारू ग्रामीण भागात खुलेआम विकली जात आहे. शहरी भागातून ग्रामीण भागात मोटारसायकलवर दारूची ह्यपार्सलह्ण पोचविली जाते. दारूच्या व्यसनाकडे युवावर्ग भरकटत चालला आहे. यावर आळा घालण्यासाठी सर्व प्रकारची देशी, विदेशी दारुबंदी करुन आदर्श जिल्हा निर्माण करण्यात यावा, या मागणीसाठी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ भगत यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकार्यांशी चर्चा केली. गत दोन वर्षांपासून जिल्हय़ात दारुबंदी व्हावी व निवडणूक काळात पुर्णत: दारु बंदी व्हावी, याकरिता जिल्हा प्रशासन व शासनाला निवेदन दिले; परंतु यावर कोणतीही कारवाई झाली नाही. दारूच्या व्यसनामुळे भांडण, तंटे वाढले असल्याचे निवेदनात नमूद आहे. दारूबंदीबाबत यापूर्वी महिला मंडळ, काही ग्रामपंचायतींनी दारूबंदीचे ठराव पारित केले आहेत; मात्र प्रशासन यावर काहीच कार्यवाही करीत नसल्याबाबत यावेळी खंत व्यक्त केली. दारू विक्रेत्यांविरोधात कारवाई करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. या शिष्टमंडळात जिल्हा उपाध्यक्ष संध्या पंडित, जिल्हा सचिव सुमन ताजने, वाशिम तालुकाध्यक्ष डी. एस. कांबळे, मालेगाव तालुकाध्यक्ष हरिचंद्र पोफळे, गोविंद इंगळे, ज्ञानदेव सुरवाडे, पंढरी खिल्लारे, नागोराव उचित, प्रा. पा. उ. जाधव, दिलीप गवई, अभिमन्यु पंडित, शिवाजी पडघान, इंदुमती जांभरूनकर, राजू बेलखेडे, एन.के गायकवाड आदी पदाधिकार्यांचा समावेश होता.