वाशिम : निवृत्ती वेतनधारकांनादेखील सातवा वेतन आयोग लागू झाला असून, सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा प्रथम हप्ता ऑगस्ट २०१९ च्या निवृत्ती वेतनासोबत बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे, असे जिल्हा कोषागार अधिकारी चंद्रकांत खारोडे यांनी स्पष्ट केले.निवृत्तीवेतनधारकांनादेखील सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर जिल्ह्यातील काही निवृत्ती वेतनधारकांच्या जून २०१९ च्या निवृत्तीवेतनासोबत सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा प्रथम हप्ता बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. उर्वरित निवृत्ती वेतनधारक व कुटूंब निवृत्ती वेतनधारकांच्या बँक खात्यात सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा प्रथम हप्ता जुलै २०१९ च्या निवृत्ती वेतनासोबत जमा करण्यात येणार होता. परंतु, काही तांत्रिक अडचणीमुळे थकबाकीची रक्कम जमा करण्यात आलेली नाही. थकबाकीची ही रक्कम आॅगस्ट २०१९ च्या नियमित निवृत्ती वेतनासोबत जमा करण्यात येईल, असे वाशिमचे जिल्हा कोषागार अधिकारी चंद्रकांत खारोडे यांनी सांगितले.
सातव्या वेतन आयोगाची थकबाकी ऑगस्टच्या वेतनासोबत जमा होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 15:44 IST