नायब तहसीलदारावर हल्ला करणा-यांना अटक
By Admin | Updated: March 2, 2016 02:42 IST2016-03-02T02:42:55+5:302016-03-02T02:42:55+5:30
वाशिम येथील हल्ला प्रकरण; चार जण ताब्यात.

नायब तहसीलदारावर हल्ला करणा-यांना अटक
वाशिम: नायब तहसीलदार राहुल वानखेडे यांच्यासह पथकावर हल्ला केल्याप्रकरणी चार जणांना वाशिम पोलिसांनी २९ फेब्रुवारीला रात्रीच्या दरम्यान विविध ठिकाणांहून ताब्यात घेतले. २५ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजताच्या सुमारास स्थानिक हिंगोली नाका परिसरात सदर हल्ला प्रकरण घडले होते.
तहसील पथकामार्फत तालुक्यात गौण खनिजाची चोरटी वाहतूक रोखण्यासाठी कारवाया सुरू आहेत. वाशिम तहसीलचे नायब तहसिलदार राहुल वानखेडे व त्यांचे पथक २५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास हिंगोली नाक्यावर उभ्या असलेल्या रेतीच्या वाहनांची कागदपत्रे तपासणीसाठी गेले होते. यावेळी रेती वाहतूकदारांनी वानखेडे व त्यांच्या पथकातील कर्मचार्यांसोबत वाद घालून शिवीगाळ केली. महसूल कर्मचारी या घटनेची चित्रफित काढत असताना त्यांचा मोबाइल अज्ञात इसमाने हिसकावून घेतला. या घटनेदरम्यान रेती वाहतूकदार उमेश मोहळे याने नायब तहसीलदारांची कॉलर पकडून मारहाण केली, तर गोवर्धन हिरवे याने टॉमी काढून जिवाने मारण्याचा प्रयत्न केला. अशा तक्रारीहून आरोपींविरुद्ध वाशिम शहर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात सहभाग असणार्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर व उपविभागीय पोलीस अधिकारी जयकुमार चक्रे यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथके विविध ठिकाणी रवाना झाली होती. तीन-चार दिवसांच्या शोधानंतर या पथकाने सोमवारच्या रात्रीदरम्यान मेहकर, हिंगोली, मालेगाव व कनेरगाव नाका येथून उमेश मोहळे, गोवर्धन हिरवे, दशरथ नेहुल व बाळू गावंडे यांना ताब्यात घेतले. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी जयकुमार चक्रे यांच्या मार्गदर्शनात परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अनिल कांबळे, ठाणेदार रवींद्र देशमुख, पोलीस उपनिरीक्षक अमित जाधव यांच्या पथकाने पार पाडली.