वाशिम जिल्हा परिषदेच्या बहुचर्चित नियोजनाला मंजुरी!
By Admin | Updated: March 25, 2017 02:31 IST2017-03-25T02:31:36+5:302017-03-25T02:31:36+5:30
तीर्थक्षेत्रासह जनसुविधेसाठी पाच कोटींचा निधी

वाशिम जिल्हा परिषदेच्या बहुचर्चित नियोजनाला मंजुरी!
वाशिम, दि. २४- जिल्हा परिषदेच्या बहुचर्चित अशा तीर्थक्षेत्र विकास व जनसुविधेंतर्गतच्या कामांच्या नियोजनाला जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिली आहे. या नियोजनानुसार तीर्थक्षेत्र विकासासाठी दोन कोटी रुपये तर जनसुविधेसाठी तीन कोटी रुपये जिल्हा परिषदेला प्राप्त झाले. जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परिषदेला जनसुविधा आणि तीर्थस्थळांच्या विकासासाठी निधी पुरविला जातो. या कामांचे नियोजन व तांत्रिक बाबींची पूर्तता करून परिपूर्ण असा अहवाल जिल्हा परिषदेतर्फे जिल्हा नियोजन समितीकडे पाठविला जातो. जिल्हा परिषदेने जनसुविधा या शीर्षकाखाली ३ कोटी रुपयांचे नियोजन तर तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी २ कोटी रुपयांचे नियोजन तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हा नियोजन समिती व जिल्हाधिकार्यांकडे पाठविला होते. काही त्रुटी असल्याचे कारण समोर करून जिल्हा नियोजन समितीने सदर नियोजन परत जिल्हा परिषदेकडे पाठवून, दुरुस्त्या सुचविल्या. यापूर्वीच्या आर्थिक दायित्व असलेल्या कामांवर काही निधी खर्च करून उर्वरित सर्व निधी सन २0१६-१७ मधील कामांवर खर्च करण्याची अट टाकली. ही अट मान्य करून व सुचविलेल्या दुरुस्तीसह जिल्हा परिषदेने सदर नियोजन मंजुरीसाठी परत नियोजन समितीकडे पाठविले. मार्च एन्डिंगच्या धावपळीमुळे या नियोजनाकडे सर्वांंचे लक्ष लागून होते. दुरुस्तीसह सादर केलेल्या या नियोजनाला जिल्हाधिकार्यांनी २१ मार्चला मान्यता दिली. मंजूर झालेल्या या आराखड्यातून जवळपास पाच कोटी रुपयांची कामे ग्रामीण भागात होणार आहेत. जनसुविधा या शीर्षकाखाली ३ कोटी रुपये मंजूर आहेत. या निधीतून यापूर्वीच्या आर्थिक दायित्व असलेल्या कामांवर ३३ लाख ३८ हजार ४१९ रुपये खर्च करावे लागणार आहेत. त्यानंतर उर्वरित निधी सन २0१६-१७ च्या नियोजनातील ११६ कामांवर खर्च होणार आहे. जनसुविधेंतर्गत स्मशानभूमी शेड बांधकाम, स्मशानभूमी सौंदर्यीकरण, संरक्षण भिंत, स्मशानभूमी परिसरात पेव्हर ब्लॉक रस्ता, स्मशानभूमीत बसण्यासाठी आसन व्यवस्था, पाण्याची सुविधा, ग्रामपंचायत इमारत दुरुस्ती व नवीन ग्रामपंचायत इमारत आदी कामांवर हा निधी खर्च करावा लागणार आहे.