दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून २३ जुलैपर्यंत अर्ज मागविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:28 IST2021-07-10T04:28:16+5:302021-07-10T04:28:16+5:30
दहावीनंतर कमी कालावधीचे तंत्रशिक्षण घेऊन अभियंता होण्यासाठी व त्यानंतर नोकरी किंवा छोटासा उद्योग उभारण्यासाठी तंत्र शिक्षणातील पदविका अभ्यासक्रम हा ...

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून २३ जुलैपर्यंत अर्ज मागविले
दहावीनंतर कमी कालावधीचे तंत्रशिक्षण घेऊन अभियंता होण्यासाठी व त्यानंतर नोकरी किंवा छोटासा उद्योग उभारण्यासाठी तंत्र शिक्षणातील पदविका अभ्यासक्रम हा एक उत्तम पर्याय आहे. हा पदविका अभ्यासक्रम दहावीनंतर तीन वर्षाचा आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर औद्योगिक क्षेत्रात रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होतात. या अभ्यासक्रमाच्या विविध शाखा आहेत. यामध्ये मुख्यत्वे सिव्हिल, ऑटोमोबाइल, इलेक्ट्रीकल, मॅकेनिकल अणुविद्युत व माहिती तंत्रज्ञान या मुख्य शाखांचा समावेश आहे. त्यांच्या बाकी सर्व शाखा या उपशाखा आहेत. विद्यार्थ्यांना आवडीप्रमाणे शाखा निवडून अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार विविध शिष्यवृत्ती शासनातर्फे देण्यात येतात. त्या शिष्यवृत्तीचा उपयोग विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी हातभार लागू शकतो. पदविका शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्याला थेट व्दितीय वर्षात पात्रतेनुसार प्रवेश घेता येतो.
दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी तंत्रशिक्षण विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी. दहावीनंतरची अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज करण्याची प्रक्रिया २३ जुलैपर्यंत संकेतस्थळावर ऑनलाइन पध्दतीने नोंदवून इ-एफसीव्दारे किंवा सुविधा केंद्रास प्रत्यक्ष भेट देऊन प्रवेश निश्चित करून घ्यावा. काही अडचण असल्यास विद्यार्थ्यांनी तंत्रनिकेतनच्या समुपदेशन कक्षाचे प्रभारी प्रा. डी.के. बावणे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. वि.रं. मानकर यांनी केले आहे.