पेरणीसाठी ‘अष्टसूत्री’चा अवलंब करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:43 IST2021-05-18T04:43:23+5:302021-05-18T04:43:23+5:30
जिल्ह्यातील इतर गावांसह पार्डी ताड परिसरातही सोयाबीन पिकाचाच अधिक पेरा केला जातो. दरम्यान, यावर्षी सोयाबीनची उत्पादकता वाढावी, यासाठी जिल्हा ...

पेरणीसाठी ‘अष्टसूत्री’चा अवलंब करण्याचे आवाहन
जिल्ह्यातील इतर गावांसह पार्डी ताड परिसरातही सोयाबीन पिकाचाच अधिक पेरा केला जातो. दरम्यान, यावर्षी सोयाबीनची उत्पादकता वाढावी, यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाच्या चमूने सोयाबीन पेरणीची अष्टसूत्री तयार केलेली आहे. त्याची माहिती कृषी सहायक हिसेकर यांनी यावेळी दिली.
पेरणीपूर्वी बियाण्याची उगवणशक्ती तपासणे, बीज प्रक्रिया करणे, योग्य वाणाची निवड करणे, योग्य वेळेवर पेरणी करणे, योग्य खोलीवर पेरणी करणे, रासायनिक खतांची मात्रा योग्य प्रमाणात देणे, तणनाशकाचा वापर योग्यप्रकारे करणे आदी बाबींचा अष्टसूत्रीमध्ये समावेश करण्यात आला आहे. यानुसार पेरणी केल्यास उत्पादन खर्चात बचत होऊन अधिक उत्पादन घेणे शक्य आहे. या पद्धतीमुळे १० टक्के रासायनिक खतांचीदेखील बचत होऊ शकते, असे हिसेकर यांनी सांगितले. यावेळी मुरलीधर माचलकर, पोलीस पाटील राजू ठाकरे, श्याम दहापुते, मंगेश चोपडे, आदी शेतकरी उपस्थित होते.
.............
रासायनिकऐवजी जैविक खतांचा करा वापर
यावर्षी रासायनिक खतांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यास पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी जैविक खताचा वापर करण्यावर भर द्यावा. सोयाबीनची बीज प्रक्रिया व उगवणशक्ती तपासून पेरणी केल्यास नुकसान टळून उत्पादनात निश्चितपणे वाढ होणे शक्य आहे, असे तालुका कृषी अधिकारी रवींद्र इंगोले यांनी सांगितले.