मुला -मुलींना जंतनाशक गोळींचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 13:35 IST2017-08-18T13:35:27+5:302017-08-18T13:35:27+5:30

anti worm pills distribution to children | मुला -मुलींना जंतनाशक गोळींचे वाटप

मुला -मुलींना जंतनाशक गोळींचे वाटप

वाशिम : १ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींमध्ये आतड्याचा कृमीदोष हा मातीतून प्रसारीत होणाºया जंतामुळे होत असून, राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त १८ आॅगस्ट रोजी अंगणवाडी व शाळेतील विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळी दिली जात आहे.

वैयक्तिक व परिसर स्वच्छतेच्या अभावाने कृमीदोष उद्भवू शकतो. मातीतून प्रसारित होणाºया जंतांमुळे १ ते १४ वर्ष वयोगटातील ६८ टक्के बालकांमध्ये आतड्याचा कृमीदोष आढळतो, असे जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. बालकांमध्ये आढळणारा कृमीदोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण ठरतो. तसेच यामुळे बालकाची बौद्धिक व शारीरिक वाढही खुंटते, असा दावा आरोग्य विभागाने केला आहे. आतड्याच्या कृमीदोषाचे मूळ हे जंतांमध्ये असून, या जंतांचा नाश करण्यासाठी जंतनाशक गोळी देणे आवश्यक आहे. यासंदर्भात जनजागृती व १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना जंतनाशक गोळी देण्याच्या उद्देशाने दरवर्षी १८ आॅगस्ट रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्ताने एक ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना शाळा व अंगणवाडीमध्ये जंतनाशक गोळी दिली जात आहे. या गोळीचा कोणताही दुष्परिणाम (साईड इफेक्ट) होणार नाही. त्यामुळे याबाबत कोणतीही भीती बाळगण्याचे कारण नाही, असे डॉ. सेलोकर यांनी सांगितले. 

वाशिम जिल्ह्यात ग्रामीण भागात ८३६ शासकीय, २७३ शासकीय अनुदानित व ३२ खाजगी अनुदानित अशा एकूण ११४१ शाळा, तसेच १०६४ अंगणवाडी केंद्रांमध्ये सुमारे २ लाख ९२ हजार मुला-मुलींना जंतनाशक गोळीचे वाटप होणार आहे. १८ आॅगस्ट रोजी गैरहजर असलेल्या मुलांसाठी २३ आॅगस्ट २०१७ रोजी मॉपअप दिनी जंतनाशक गोळीचे वाटप करण्यात येईल.

Web Title: anti worm pills distribution to children