‘समृद्धी’वर पुन्हा अपघात; सातजण गंभीर जखमी
By सुनील काकडे | Updated: May 19, 2023 18:15 IST2023-05-19T18:15:40+5:302023-05-19T18:15:58+5:30
चालकाच्या डुलकीचा परिणाम, सुदैवाने जीवितहानी टळली

‘समृद्धी’वर पुन्हा अपघात; सातजण गंभीर जखमी
वाशिम : तुळजापूरहून नागपूरला एका कुटूंबास घेऊन जाणाऱ्या वाहनाच्या चालकाला प्रवासादरम्यान डुलकी लागली. यामुळे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात सातजण गंभीर जखमी झाले. समृद्धी महामार्गावरील कारंजा टोल प्लाझानजिक १९ मे रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, नखाते आणि करंडे कुटुंबीय तुळजापूर येथून नागपूरला चारचाकी वाहनाने चालले होते. वाहन कारंजा टोल प्लाझानजिक आले असता, चालकास अचानक डुलकी लागल्याने वाहन रस्त्यावर उलटले. यात सचिन नखाते (४८), छाया विष्णू करंडे (५४), सोनाक्षी सचिन नखाते (१२), तेजस्विनी अनुराग करंडे (२८), मल्हार नखाते (४), कृष्ण करंडे (५), आरती नखाते (४०) आणि विष्णू करंडे (६५) असे सातजण गंभीर जखमी झाले.
यादरम्यान मंगरूळपीर येथील गजानन मिटकरे हे वाहनाने नागपूरला जात असताना त्यांनी थांबून काही जखमींना स्वत:च्या वाहनाद्वारे कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तसेच समृद्धी १०८ ला कॉल करून अपघाताची माहिती दिली. त्यावरून चमूने घटनास्थळ गाठून उर्वरित रुग्णांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. अहमद अकबानी यांनी प्रथमोपचार करून गंभीर अवस्थेतील रुग्णांना अमरावती येथे ‘रेफर’ केले.