पाहणीविनाच जनावर विक्रीचा दाखला!
By Admin | Updated: April 18, 2017 01:24 IST2017-04-18T01:24:27+5:302017-04-18T01:24:27+5:30
गुरांच्या बाजारातील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर : चोरीच्या जनावरांची विक्री होण्याची शक्यता

पाहणीविनाच जनावर विक्रीचा दाखला!
स्टिंग आॅपरेशन
शीतल धांडे - रिसोड
जनावरांची कोणत्याही प्रकारे पाहणी न करताच खरेदी-विक्रीची अधिकृत पावती दिली जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनने समोर आणला.
चोरीच्या जनावर विक्रीला पायबंद बसावा, जनावर खरेदी-विक्रीच्या व्यवहारात पारदर्शकता यावी, यासाठी सहकार व पणन विभागाने काही बंधने घालून दिलेली आहेत. ही बंधने गुरांच्या बाजारात पाळली जात नाहीत, अशी माहिती ‘लोकमत’ प्रतिनिधीला मिळाली. त्यानुसार रिसोड, मालेगाव, कारंजा, वाशिम यासह अन्य बाजार समितीतील गुरांच्या बाजारात पाहणी केली असता काही ठिकाणी ओळखीचा पुरावा मागितला जातो, तर काही ठिकाणी कोणताही पुरावा न मागता व जनावरांची पाहणी न करताच अधिकृत पावती दिली जात असल्याचे आढळून आले. हा प्रकार जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीतील गुरांच्या बाजारात कमी-अधिक प्रमाणात सुरू आहे. बाजार समिती प्रशासनाच्या सूचना असतानाही, गुरांच्या बाजारात पावती बनविताना या नियमांकडे फारसे गांभीर्याने बघितले जात नसल्याचे दिसून येते. त्यामुळे चोरीच्या जनावरांची विक्री होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
वाशिम जिल्ह्यात बाजार समिती व उपबाजारातून जनावरांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार चालतात. चोरीच्या जनावरांच्या विक्रीला रोख लावणे आणि चोरीच्या घटना उघडकीस आणण्याचे प्रमाण वाढविणे, या दुहेरी उद्देशाने सरपंच, पोलीस पाटील किंवा ग्रामसेवकाने दिलेला जनावर मालकी हक्काचा दाखला पशुपालकाने सोबत आणणे बंधनकारक आहे. जनावर खरेदी-विक्रीचा व्यवहार झाल्यानंतर बाजार समितीमधून जनावर घेणाऱ्याला अधिकृत दाखला घ्यावा लागतो. असा दाखला देताना संबंधितांनी सरपंच किंवा पोलीस पाटलाचा दाखला, ओळखपत्र म्हणून मतदान कार्ड किंवा आधार कार्ड पाहणे आवश्यक आहे. वर्णन केलेल्या जनावरांची खात्री म्हणून पाहणी करणेही आवश्यक आहे. या नियमाला काही ठिकाणी पायदळी तुडविले जात आहे. जनावर खरेदी-विक्री करणाऱ्या इसमांची कोणतीही खातरजमा केली जात नाही, ओळखीचा पुरावा न मागताच जनावराच्या खरेदी-विक्रीचा अधिकृत दाखला दिला जात असल्याचे दिसून आले. याकडे जिल्हा उपनिबंधकांसह बाजार समिती प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
बाजार समितीमधील गुरांच्या बाजारात जनावरांची खरेदी-विक्री करताना संंबंधिताचा ओळखीचा पुरावा घेणे गरजेचे आहे. ओळखीचा पुरावा न घेता किंवा जनावरांची पाहणी न करता खरेदी-विक्रीची पावती देणे ही गंभीर बाब आहे. याप्रकरणी योग्य ती चौकशी केली जाईल.
- ज्ञानेश्वर खाडे, जिल्हा उपनिबंधक, वाशिम