पशू खाद्याचे दर भिडले गगणाला!
By Admin | Updated: April 14, 2017 01:22 IST2017-04-14T01:22:31+5:302017-04-14T01:22:31+5:30
वाशिम : दुधाळ जनावरांचे प्रमुख खाद्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरकी ढेपीचे दर सध्या गगणाला भिडले असून, २०१६ च्या तुलनेत सध्या हे दर दुपटीने वाढले आहेत.

पशू खाद्याचे दर भिडले गगणाला!
वाशिम : दुधाळ जनावरांचे प्रमुख खाद्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरकी ढेपीचे दर सध्या गगणाला भिडले असून, २०१६ च्या तुलनेत सध्या हे दर दुपटीने वाढले आहेत. विदर्भातून कपाशीचे पीक हद्दपार होण्यासोबतच आॅईल कंपन्यांनी ढेपेचा अनधिकृतरीत्या साठा करुन ठेवल्यानेच ही विदारक स्थिती उद्भवल्याचा सूर जाणकारांमधून आळविला जात आहे.
सरकीपासून तयार होणाऱ्या ढेपीचे दर गतवर्षी अर्थात २०१६ मध्ये १६०० ते १७०० रुपये प्रतिक्विंटल होते; तर सद्या या दरांत झालेल्या तुफानी वाढीमुळे बाजारपेठेत सरकी ढेपेची तब्बल २७०० ते २८०० रुपये प्रतिक्विंटलने विक्री होत आहे. यामुळे दुधाचा व्यवसाय करणारे सर्वसामान्य पशूपालक आर्थिक डबघाईस आले असून त्यांना दुधाचा व्यवसाय करणे परवडेनासे झाले आहे.
वाशिम जिल्ह्यात प्रामुख्याने गुजरात, आदिलाबाद, आंध्रप्रदेश, भैसा, अमरावती, अकोला, परभणी, हिंगोली, जळगांव आदी शहरांमध्ये असलेल्या आॅईल मीलमधून सरकीपासून तेल काढल्यानंतर तयार होणारी ढेप वाशिम जिल्ह्यात विक्रीसाठी आणली जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून कपाशीच्या उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट झाल्याने आॅईल कंपन्यांना पुरेशा प्रमाणात सरकी मिळणे दुरापास्त झाल्याने त्याचा थेट परिणाम ढेपेच्या दरवाढीवर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. असे असले तरी सरकी ढेपेची देखील संबंधित व्यावसायिकांनी अनधिकृतरित्या साठवण करुन ठेवल्यामुळेच दर वाढल्याची शक्यता जाणकारांमधून वर्तविली जात आहे. यासंदर्भात प्रशासनाने चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.