अन् वाशिम जिल्हा सुन्न झाला !
By Admin | Updated: June 4, 2014 01:22 IST2014-06-04T01:16:37+5:302014-06-04T01:22:30+5:30
कार अपघाताच्या घटनेनंतर निधन धडकले अख्खा वाशिम जिल्हा सुन्न झाला

अन् वाशिम जिल्हा सुन्न झाला !
वाशिम: केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे आज सकाळी ६.३0 वाजता कार अपघाताच्या घटनेनंतर निधन झाल्याचे वृत्त टिव्ही व विविध न्यूज चॅनेल्सवर झळकले अन् पहाटेवर दु:खाचे सावट पसरून अख्खा वाशिम जिल्हा सुन्न झाला. वाशिम जिल्हयात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकत्यांप्रमाणेच अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांशी विविध सामाजिक नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी मुंडे यांचा संपर्क होता. जिल्हयात त्यांचे नेटवर्क मोठे होते. जिल्हयात भाजपाप्रमाणेच अन्य पक्षातही त्यांचे चाहते मोठया प्रमाणात आहेत. म्हणूनच त्यांच्या निधनाचे वृत्त येताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाउ लागली. शिरपूरजैन येथे हे वृत्त कळताच व्यापार्यांनी नुकतीच उघडलेली दुकाने तात्काळ बंद करुन बाजारपेठ बंद ठेवली संपूर्ण बाजारपेठ सायंकाळपर्यंत बंद ठेवून व्यापार्यांनी शोकसंवेदना व्यक्त केली. त्याचप्रमाणे मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथे सुद्धा व्यापार्यांनी दुकाने सायंकाळपर्यंत बंद ठेवली. वाशिम,कारंजा, मंगरुळपीर, रिसोड मालेगाव, मानोरा, या मोठया शहरासह जिल्हयातील लहानमोठया गावांमध्ये मुंडेच्या निधनाचे वृत्त सकाळी समजताच चौकाचौकात लोक एकत्र जमन या एकच विषयावर चर्चा करताना आढळून येत होते. लोक दिवसभर हॉटेल व पानटटयावर असलेल्या टीव्हीसमोर जमून या घटनेबाबत स्पेशल रिपोर्ट ऐकताना दिसून येत होते.