युतीचा घटस्फोट आघाडीच्या पथ्यावर
By Admin | Updated: September 19, 2014 23:49 IST2014-09-19T23:42:19+5:302014-09-19T23:49:33+5:30
वाशिम जिल्हात राजकीय पक्षांकडे प्रबळ उमेदवारांची वाणवा: कार्यकर्त्यांचीही भासणार कमतरता.

युतीचा घटस्फोट आघाडीच्या पथ्यावर
नागेश घोपे
वाशिम- गल्लीपासून तर दिल्लीपर्यंतच्या निवडणुका गळ्यात गळे घालून लढणार्या शिवसेना-भाजप युतीचा घटस्फोट जिलत काँग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या पथ्यावर पडणार आहे. दुभंगणार्या युतीमुळे तिन्ही मतदारसंघातील राजकीय समिकरणांची पुरती उलथापालथ होणार असून यामध्ये दोन्ही पक्षांचेही पानीपत होण्याचे संकेत आहेत.
जिलतील विधानसभेच्या तीन मतदारसंघापैकी दोन मतदारसंघ भारतीय जनता पक्षाच्या तर एक मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्यावर आहे. यापैकी अनुसुचित जातीच्या उमेदवारासाठी आरक्षित असलेला वाशिम मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा गड मानला जातो.मतदारसंघातील वाशिम शहराचा अपवाद वगळता ग्रामीण भागात तथा मंगरूळपीर तालुक्यात भाजपाच्या तुलनेत शिवसेनेचीच राजकीय शक्ती अधिक आहे.युतीच्या घटस्फोटामुळे भाजपच्या या गडाला सुरूंग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.मालेगाव व रिसोड या दोन तालुक्यांचा समावेश असलेल्या रिसोड मतदारसंघात भाजपचे संघटन बर्यापैकी असले तरी, शिवसेनेचे प्राबल्यही कमी नाही. यावेळी युती तुटली तर,येथे भाजपला फटका निश्चित मिळणार आहे.
जिलतील कारंजा हा एकमेव मतदारसंघ शिवसेच्या वाट्यावर आहे. कारंजा व मानोरा तालुक्याचा या मतदारसंघात समावेश कारंजा शहरात शिवसेनेच्या तुलनेत भाजपची ताकद अधिक आहे. ग्रामीण भागातही भाजपची पाळेमुळे खोलवर रूजलेली आहेत.त्यामुळे स्वबळावर नशिब आजमाविण्याच्या विचारात असलेल्या शिवसेनेला येथे विजयाच्या गावापर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही.
एकंदरीत शिवसेना व भारतीय जनता पक्षाची युती दुभंगल्यास जिलत त्याचा सर्वाधिक राजकीय फायदा काँग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला होणार असल्याचे आडाखे जाणकारांकडून बांधले जात आहेत.