आगीत अलाहाबाद बँकेचे ४0 लाखाचे साहित्य खाक
By Admin | Updated: January 27, 2016 23:31 IST2016-01-27T23:31:05+5:302016-01-27T23:31:05+5:30
शॉट सर्किटमुळे लागली आग; रिसोड येथील घटना.

आगीत अलाहाबाद बँकेचे ४0 लाखाचे साहित्य खाक
रिसोड (जि. वाशिम): शॉट सर्किटमुळे लागलेल्या आगीत स्थानिक सिव्हील लाईन मार्गावरील अलाहाबाद या राष्ट्रीयीकृत बँकेचे ४0 लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना २५ जानेवारीला रात्री १0 वाजताच्या सुमारास घडली होती. या बँकेच्या पीक विम्यासंदर्भात आमदार अमित झनक यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडली होती, हे विशेष. आगीच्या या घटनेची फिर्याद बँक व्यवस्थापक प्रदिप मिङ्म्रा यांनी दिली की, बँक कार्यालयातील सर्व्हर रुमला शॉर्ट सर्कीट मुळे आग लागून एकूण ४0 लाखाचे नुकसान झाले. आगीमध्ये संगणक, प्रिन्टर, लॅपटॉप, स्कॅनर, सिसिटीव्ही कॅमेरे, एलईडी, कार्यालयीन फर्निचर, महत्वपूर्ण फायली, कागदपत्रे जळून खाक झाले. बँकेला लागलेल्या आगीबाबत चर्चेला पेव फुटले आहे. आग नेमकी कशी लागली, काही घातपात तर नाही ना? अशा शंका व्यक्त केल्या जात आहेत. हिवाळी अधिवेशनात आमदार झनक यांनी याच बँकेच्या पीक विम्याच्या रकमेसंदर्भात लक्षवेधी मांडून शासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर शॉट सर्किटने बँकेला आग लागल्याने उलट-सुलट चर्चा समोर येत आहेत. रिसोड शहरात शासकीय व अशासकीय कार्यालयास आग लागण्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी पंचायत समिती कार्यालय, पशुवैद्यकीय दवाखान्याला आग लागली होती. यामुळे आग लागली की लावली जाते? अशी उलट सुलट चर्चा सुरु आहे.