महामार्गावर दारू विक्री सुरूच!
By Admin | Updated: April 20, 2017 02:10 IST2017-04-20T02:10:14+5:302017-04-20T02:10:14+5:30
वाशिम : हायवेवर विकल्या जाणारी दारू शासनाच्यावतीने बंद करण्यात आल्यानंतरही अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट, ढाब्यांवर सर्रास दारूची विक्री होत असून, याकडे संबंधितांचे साफ दुर्लक्ष दिसून येत आहे.

महामार्गावर दारू विक्री सुरूच!
वाशिम : हायवेवर विकल्या जाणारी दारू शासनाच्यावतीने बंद करण्यात आल्यानंतरही अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट, ढाब्यांवर सर्रास दारूची विक्री होत असून, याकडे संबंधितांचे साफ दुर्लक्ष दिसून येत आहे.
शासनाच्यावतीने १ एप्रिलपासून हायवेवर असलेल्या ५०० मीटरच्या आतमधील रेस्टॉरंट, ढाबा, बीअर बार, बीअर शॉप यांना सील ठोकले आहे. वाशिम जिल्ह्यात ४२ देशी दारूच्या दुकानांना सील लावल्यानंतर केवळ १४ दारूची दुकाने शिल्लक राहिली आहेत, तर जिल्ह्यात एकही वाईन शॉप नसल्याने ठरलेल्या दरात दारू पिणाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. जिल्ह्यातील ९४ वाईन बार बंद झाले असून, केवळ तीन बार सुरू आहेत. यामध्ये वाशिमच्या दोन बारचा समावेश व उर्वरित संपूर्ण जिल्ह्यात एकच बार आहे. बारवर गर्दी पाहता अव्वाच्या सव्वा भावाने दारू विकल्या जात असल्याची ग्राहकांची ओरड होत असली, तरी कोणताही वाद न घालता काही जण दारू विकत घेत आहेत. एवढया गर्दीत कोण जाणार म्हणून अनेक मद्यपी हायवेवरील रेस्टॉरंट, ढाब्यांकडे धाव घेत आहेत. ग्राहक तुटू नये म्हणून अनेक व्यावसायिक मद्यपींची सोय करताना दिसून येत आहेत. काही रेस्टॉरंटवर तर चक्क खुलेआम दारू विक्री होत असल्याचे चित्र आहे. पोलीस विभागात काही रेस्टॉरंट चालकांचे नातेवाईक असल्याने त्यांना त्रास होत नसल्याचे त्यांचे प्रतिस्पर्धी व्यावसायिक बोलताना दिसून येत आहेत. याकडे कर्तव्यतत्पर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष देऊन त्याला आळा घालणे गरजेचे आहे. जिल्हयात १८४ ठिकाणी देशी, विदेशी दारू १ एप्रिलपूर्वी मिळत होती, ती आता केवळ २४ ठिकाणी मिळत आहे. यामुळे सकाळपासून अनेक दुकानांवर गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. रात्रीच्यावेळी अनेक ढाब्यांवर, रेस्टॉरंटवर दारू खुलेआम विक्री होत असून, याकडे पोलीस विभागाने लक्ष ेदेणे गरजेचे झाले आहे.
जिल्ह्यात केवळ १० वाईन बार व बीअर शॉप
१ एप्रिलपूर्वी सुरू असलेले १८४ देशी-विदेशी दारू शॉप, बीअर शॉप १ एप्रिलपासून बंद झाल्यानंतर देशी दारूची १४ दुकाने वगळता केवळ सात बीअर शॉप व तीन वाइन बार शिल्लक राहिले आहेत. दारू पिणाऱ्यांची संख्या पाहता ही दुकाने कमी पडत असल्याने सुरू असलेल्या दुकानांसह ज्या ढाब्यावर, रेस्टॉरंटवर दारू मिळत आहे तेथे मोठ्या प्रमाणात मद्यपींची गर्दी होताना दिसून येत आहे.
हायवेवर असलेल्या जिल्ह्यातील १६२ दुकानांना सील करण्यात आले आहे. ज्या दुकानांना सील केले आहे, तेथे जर रेस्टॉरंट असेल तर त्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन सील करण्यात आलेल्या परमीट रुमची पाहणी वारंवार केल्या जात आहे. विभागाच्यावतीने लावण्यात आलेले सील व्यवस्थित असून, बाहेर कुठून दारु विक्री होत असावी.
- एन.के. सुर्वे, प्रभारी निरीक्षक, राज्य दारू उत्पादन शुल्क विभाग, वाशिम