कृषीपंप वीज जोडणीची प्रक्रिया रखडली
By Admin | Updated: June 26, 2014 02:29 IST2014-06-26T02:23:28+5:302014-06-26T02:29:33+5:30
कारंजा तालुक्याला २३१ लाभार्थींचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत केवळ ९0 वीजजोडणीचे काम पूर्णत्वाकडे

कृषीपंप वीज जोडणीची प्रक्रिया रखडली
कारंजा : बिलाच्या थकित रकमेपोटी तातडीने कृषीपंप जोडणीचा दंडुका उगारणारी वीज वितरण कंपनी कर्तव्याच्या बाबतीत मात्र गाढ झोपी गेली असल्याची बाब कृषीपंप जोडणीच्या विलंबाने उजेडात आणली आहे. दीड वर्षानंतरही वीज वितरण कंपनीला कृषीपंप जोडणीचा ५0 टक्के आकडाही गाठता आला नसल्याची शोकांतिका आहे. नवीन ऑर्डर नसल्याने कृषीपंप जोडणीचे काम ठप्प पडले आहे.
दारिद्रय़रेषेखाली जीवन जगणार्या अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकर्यांचे जीवनमान उंचाविण्याच्या दृष्टिकोनातून १९८२ पासून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये विशेष घटक योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत नवीन विहिरीसह विविध प्रकारच्या १४ ते १६ बाबींवर अनुदान दिले जाते. २0११-१२ मध्ये विविध योजनेंतर्गत घेतलेल्या विहिरींवर मोफत वीजपंप बसविणे आणि वीजजोडणी देण्याच्या उपक्रमाचा यामध्ये समावेश करण्यात आला. त्यानुसार वाशिम जिल्ह्यात १३२५ कृषीपंप व वीजजोडणीचे उद्दिष्ट मिळाले होते. वीज जोडणीसाठी प्रत्येक लाभार्थी ६६५0 रुपयाप्रमाणे ८८ लाख ११ हजार २५0 रुपये शुल्क एप्रिल ते मे २0१२ मध्येच कृषी विभागाने वीज वितरण कंपनीच्या खात्यात जमा केले आहे.
आतापर्यंत रिसोड, मालेगाव, मानोरा, वाशिम, मंगरुळपीर व कारंजा या तालुक्यात अध्र्यापर्यंतही वीजजोडणी पोहोचू शकली नाही. कारंजा तालुक्याला २३१ लाभार्थींचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत केवळ ९0 वीजजोडणीचे काम पूर्णत्वाकडे आल्याची माहिती आहे. नवीन ऑर्डर नसल्याने हा घोळ झाल्याचे सांगितले जात आहे. वीज वितरणने शेतकर्यांच्या भावनांशी जणू खेळ मांडला आहे.