कृषी कर्मचार्यांच्या संघटना आक्रमक
By Admin | Updated: July 17, 2014 01:12 IST2014-07-17T00:59:09+5:302014-07-17T01:12:31+5:30
मानोरा येथील तोडफोड प्रकरण: उपजिल्हाधिकार्यांना साकडे

कृषी कर्मचार्यांच्या संघटना आक्रमक
वाशीम: जिल्ह्यातील मानोरा येथील कृषी कार्यालयात झालेल्या तोडफोड प्रकरणाचे पडसाद १६ जुलैला जिल्हाभरात उमटले. याप्रकरणी दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी कृषी विभागात कार्यरत कर्मचार्यांच्या संघटना एकवटल्या. संघटनांच्या काही पदाधिकार्यांनी निवासी उपजिल्हाधिकार्यांना साकडे घातले. यामध्ये तालुका कृषी अधिकारी संघटना, कृषी पर्यवेक्षक संघटना, कृषी सहायक संघटना, अनुरेखक संघटना आदींचा समावेश होता.
कृषी कर्मचार्यांच्या संघटनांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर केले. यामध्ये त्यांनी म्हटले की, मानोरा येथील कृषी कार्यालयात १४ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास, अधिकारी कर्मचारी काम करीत असताना एका राजकीय पक्षाच्या पदाधिकार्यांनी गोंधळ घातला होता. यातील एका राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकार्यांनी मंडळ कृषी अधिकारी मुडा यांच्याशी शाब्दिक वाद घातला. शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करुन अश्लील भाषेत शिवीगाळ करत शासकीय मालमत्तेचे नुकसान केले. या प्रकरणाची मानोरा पोलिसात रितसर तक्रार करण्यात आली; परंतु झालेल्या घटनेमुळे अधिकारी व कर्मचार्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या संपूर्ण प्रकरणाचा कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचार्यांच्या संघटनांनी निषेध केला आहे.
याप्रकरणी कायदेशीर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही कृषी विभागातील अधिकारी, कर्मचार्यांच्या संघटनांनी उपजिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.