महसूल व कृषिमंत्र्यांच्या दौ-यानंतरही शेतक-यांना मदतीची प्रतीक्षाच
By Admin | Updated: November 24, 2014 01:59 IST2014-11-24T01:33:52+5:302014-11-24T01:59:26+5:30
५0 टक्के नफ्यावर आधारित हमीभावाचे आश्वासनाची पुर्तता कधी?

महसूल व कृषिमंत्र्यांच्या दौ-यानंतरही शेतक-यांना मदतीची प्रतीक्षाच
अकोला - शेतकर्यांच्या मालाचे कृषी मूल्य आयोगाने निर्धारित केलेल्या दरापेक्षा ५0 टक्के अधिक नफा मिळेल, एवढे दर शे तीमालाला देण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. या घोषणेवर आता भाजप सत्तेत आल्यानंतर कधी अंमलबजावणी केली जाते, याकडे शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.
लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीदरम्यान शेती विकास आणि शेतकर्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याच्या दृष्टिकोनातून भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात अनेक घोषणा केल्या होत्या. त्यापैकी कृषी मूल्य आयोगातर्फे निर्धारित करण्यात येणार्या दरात शेतकर्यांना उत्पादनासाठी लागणार्या खर्चाचा विचार करून ५0 टक्के नफा मिळेल, याचा विचार करून हमीभाव निर्धारित केले जातील, ही प्रमुख घोषणा होती. या घोषणेवर भाजपचे केंद्र आणि राज्यातील सरकार कधी अंमलबजावणी करणार किंवा यापूर्वीच्या सरकारप्रमाणेच याही सरकारकडून केवळ आश्वासनच दिले जाईल, याकडे शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.
आधुनिक शहर निर्माण करणे, मेट्रो रेल्वे, बुलेट ट्रेन, सुपर मार्केट, एफडीआय यासारख्या घोषणांसोबतच शेतकर्यांच्या हितासाठी आवश्यक असलेल्या ५0 टक्के नफ्यावर आधारित हमीभावाची घोषणा केल्यास शेतकर्यांसाठी अच्छे दिन येतील. त्यासाठी राज्यातील कृषिमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.