सव्वा लाख शेतक-यांना मिळणार पीक कर्जाचा लाभ
By Admin | Updated: June 8, 2016 01:58 IST2016-06-08T01:58:59+5:302016-06-08T01:58:59+5:30
वाशिम जिल्ह्यातील ७८ हजार शेतक-यांना पीक कर्जाचे वाटप.

सव्वा लाख शेतक-यांना मिळणार पीक कर्जाचा लाभ
वाशिम: सध्या जिल्हय़ात शेतकर्यांची पीक कर्ज घेण्यासाठी लगबग सुरू असून, शेतकरी बँकांमध्ये कर्जासाठी गर्दी करीत आहेत. यावर्षी जिल्हय़ातील सव्वा लाख शेतकर्यांना पीक कर्जाचा लाभ मिळणार असून, आतापर्यंंत ७८ हजार शेतकर्यांनी २0१६-१७ च्या खरीप हंगामासाठी पीक कर्ज घेतले आहे.
पीक कर्जाचा मुद्दा सध्या जिल्हा प्रशासनाच्या अजेंड्यावर असून, पालकमंत्री, जिल्हाधिकार्यांनी बैठक घेऊन शेतकर्यांना त्वरित पीक कर्ज देण्याचे आदेश बँकेच्या अधिकार्यांना दिले आहेत. जिल्ह्यातील किमान सव्वा लाख शेतकर्यांना ३0 जून २0१६ पर्यंंत पीक कर्जाचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ६ जून २0१६ अखेर यापैकी सुमारे ७८ हजार शेतकर्यांनी पीक कर्ज घेतले आहे.
मंगळवारी जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी शहरातील विविध बँकांची पाहणी करून पीक कर्ज वितरणाचा आढावा घेतला. तसेच या बँकांमध्ये पीक कर्जासाठी आलेल्या शेतकर्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी वाशिमचे तहसीलदार बलवंत अरखराव उपस्थित होते. जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले, की यंदा पावसाचे प्रमाण चांगले राहणार असल्याचा अंदाज असून त्यामुळे जिल्ह्यात पेरणी क्षेत्न वाढण्याची शक्यता आहे. गत काही वर्षांंपासून दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शेतकर्यांना खरीप हंगामाच्या पेरणीसाठी पीक कर्ज उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यातील किमान सव्वा लाख शेतकर्यांना पीक कर्जाचा लाभ देण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक बँकेला पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. मात्न अद्यापही अनेक बँकांचे पीक कर्ज वितरणाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे शेतकर्यांना पीक कर्ज उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे या बँकांनी शेतकर्यांचे पीक कर्ज मागणीसाठी प्राप्त होणारे अर्ज प्रलंबित न ठेवता त्यावर तातडीने निर्णय घेऊन पात्न शेतकर्यांना तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांनी यावेळी केल्या. जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी शहरातील देना बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, आयडीबीआय बँक, सिंडीकेट बँक, युको बँक, इंडियन ओवरसीस बँक, पंजाब नॅशनल बँकेच्या शाखांना भेट देऊन तेथील पीक कर्ज मागणीसाठी प्राप्त झालेले व त्यावर कार्यवाही करण्यात आलेल्या अर्जाची माहिती घेतली.