लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: राज्यातील खासगी अनुदानित सैनिक शाळांत सन २०२०-२१ च्या सत्रापासून ५ वी ऐवजी ६ वीपासून प्रवेश देण्याचे, तसेच पुढील सत्रात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती न करण्याचे निर्देश राज्य शासनाने २४ एप्रिलच्या निर्णयाद्वारे दिले आहेत.बालकांना मोफत शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील तरतुदींच्या अनुषंगाने १३ फेब्रुवारी २०१३ च्या शासन निर्णयानुसार शिक्षणाची व्याख्या व त्याच्या स्तरात सुधारणा करण्यात आली आहे. यात इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत कनिष्ठ प्राथमिक, इयत्ता सहावी ते आठवी वरिष्ठ प्राथमिक, तर इयत्ता नववी ते दहावीपर्यंत माध्यमिक, तसेच इयत्ता ११ वी ते १२ वीपर्यंत उच्च माध्यमिक शिक्षण संबोधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय विचारात सन २०२१-२२ च्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील खाजगी शासन अनुदानीत सैनिकी शाळांत इयत्ता ५ वी ऐवजी इयत्ता ६ वीमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. या निर्णयामुळे सन २०२०-२१ मध्ये इयत्ता पाचवीचा वर्ग बंद होणार असल्यामुळे काही शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. या शिक्षकांच्या समायोजनाचा स्वतंत्र आदेश काढण्यात येणार असून, तो आदेश येईपर्यंत संबंधित संस्थेने शिक्षक व शिक्षकेतरांच्या सेवांचा वापर आवश्यकतेनुसार करावा, असेही शासनाने सुचविले असून, सदर शिक्षकांचे समायोजन होईपर्यंत शासनातर्फे देण्यात येणारे वेतन अनुदानही पूर्वीप्रमाणे सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याशिवाय राज्यातील खाजगी अनुदानित सैनिकी शाळांसदर्भात सुधारित धोरण करण्याची कार्यवाही शासनस्तरावर सुरु असल्यामुळे सदर परिपत्रकाच्या दिनांकापासून अर्थात २४ एप्रिलपासून पुढील आदेश होईपर्यंत खाजगी अनुदानित सैनिकी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर पदावर कोणत्याही उमेदवाराची नियुक्ती करण्यात येवू नये तसेच कोणत्याही पदास वैयक्तिक मान्यता देण्यात येवू नये, असेही शासनाने स्पष्ट केले आहे.
खासगी अनुदानित सैनिक शाळांत आता ६ वीपासून प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 17:35 IST