लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम येथे १०० खाटांचे स्त्री रुग्णालयाच्या मुख्य इमारतीचे जवळपास ८५ टक्के बांधकाम पूर्ण झाले असून, उर्वरीत ३.४९ कोटींच्या वाढीव रकमेच्या अंदाजपत्रक व नकाशांना सार्वजनिक आरोग्य विभागाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामधून विद्युत उपकेंद्र, अग्निशमन यंत्रणेसह अन्य आवश्यक त्या सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.वाशिम येथे १०० खाटांचे स्त्री रुग्णालय चार वर्षांपूर्वी मंजूर झालेले असून, त्या अनुषंगाने बांधकामाला सुरूवात झाली होती. इमारतीचे जवळपास ८० टक्क्यापेक्षा अधिक बांधकाम झाले असून, वाढीव निधीअभावी विद्युत उपकेंद्र, एक्सप्रेस फिडरची उभारणी, अग्निशमन यंत्रणा, वातानुकुलीत यंत्रणा व अन्य सुविधांची कामे खोळंबली होती. उर्वरीत वाढीव कामासाठी जवळपास ३.४९ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळावी, असा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर केला होता. या प्रस्तावाला सार्वजनिक आरोग्य विभागाने २४ आॅक्टोबरला मान्यता दिली आहे. या वाढीव रकमेतून विद्युत उपकेंद्र, उच्च दाब व एक्सप्रेस फिडरची उभारणी यासाठी १.८ कोटी, अग्निशमन यंत्रणेसाठी १.७४ कोटी, लिफ्ट उभारणी (उद्वाहन) दोन नग यासाठी ५४.१७ लाख रुपये आणि वातानुकुलीत यंत्रणेसाठी ५३.१८ लाख अशी प्रस्तावित कामे केली जाणार आहेत. कामासाठीच्या जागेची उपलब्धता, योग्यता व जागा पुरेशी आहे किंवा नाही याबाबतची खात्री संबंधित आरोग्य संस्था प्रमुखांना करावी लागणार आहे. या कामासाठी निविदा मागविण्याआधी सदर कामास सार्वजनिक बांधकाम विभागातील सक्षम अधिकाºयांची तांत्रिक मंजूरी घ्यावी लागणार आहे.
स्त्री रुग्णालयाच्या वाढीव रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 16:29 IST